महाराष्ट्र

सोलापूरातील अवैध धंद्यांचा मुद्दा विधानसभेत; आमदार जयंत पाटील यांचा स्थगन प्रस्ताव

सोलापूरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; उच्चस्तरीय चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी

सोलापूरातील अवैध धंद्यांचा मुद्दा विधानसभेत; आमदार जयंत पाटील यांचा स्थगन प्रस्ताव

सोलापूरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; उच्चस्तरीय चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई : सोलापूर शहरात वाढत चाललेल्या अवैध धंद्यांचा मुद्दा राज्याच्या विधानसभेत गुरुवारी जोरदारपणे उपस्थित झाला. आमदार जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडत शहरातील बेकायदेशीर व्यवसायांमुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. मटका, जुगार, हातभट्टी दारू, गुटखा विक्रीसह विविध अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली.

 

सभागृहात बोलताना आमदार पाटील यांनी सोलापूरमध्ये अनेक भागांत खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असतानाही संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित आणि प्रभावी कारवाई होत नसल्याने या धंद्यांना जणू संरक्षण मिळत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

शहरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीला चालना मिळत असून, तरुण पिढीही त्याच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे केवळ छापेमारी करून औपचारिक कारवाई करण्याऐवजी या अवैध व्यवसायांच्या संपूर्ण साखळीचा शोध घेऊन त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारने सोलापूरमधील कायदा व सुव्यवस्थेची सद्यस्थिती, पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईची परिणामकारकता आणि अवैध धंद्यांना मिळणाऱ्या कथित संरक्षणाबाबत सभागृहात स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.

या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता असून, सरकार यावर कोणती भूमिका घेते आणि प्रशासन अवैध धंद्यांवर कोणती ठोस मोहीम राबवते, याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. अवैध धंद्यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात या विषयावर अधिक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!