क्राईम

महामार्गावर ‘जॅक’ टाकून लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी जेरबंद, चार गंभीर गुन्हे उघड

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ५.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, आणखी साथीदारांच्या शोधाला वेग

महामार्गावर ‘जॅक’ टाकून लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी जेरबंद, चार गंभीर गुन्हे उघड

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ५.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, आणखी साथीदारांच्या शोधाला वेग

सोलापूर : सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावर प्रवाशांच्या वाहनासमोर जॅक टाकून वाहन थांबवून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत नातेपुते पोलीस ठाण्यातील दोन आणि मोहोळ पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण चार गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, आरोपींकडून सुमारे ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

२१ जून २०२६ रोजी एक कुटुंब चारचाकी वाहनातून फलटणकडे जात असताना नातेपुते बायपासजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वाहनासमोर जॅक टाकला. त्यामुळे वाहनाचे टायर पंक्चर झाल्याने ते थांबताच चार जणांनी चाकूचा धाक दाखवत आणि काठीने मारहाण करून दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची चैन, मंगळसूत्र तसेच रोख रक्कम लुटून नेली होती. या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांचे पथक बार्शी उपविभागात गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वैराग-तुळजापूर मार्गावरील सर्जापूर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित दुचाकीवरून येताच पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी दुचाकी टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुहास विकास चौधरी (वय ३२, रा. येरमाळा, जि. धाराशिव) आणि कृष्णा सुरेश उर्फ मोतीराम शिंदे (वय १८, रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी आहेत.

चौकशीदरम्यान दोघांनी नातेपुते येथील दरोड्यासह आणखी तीन जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यांमध्ये रवि मोहन काळे, अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे आणि राहुल अंकुश काळे हे साथीदार सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपींकडून ३२ ग्रॅम वजनाचे सुमारे ४ लाख ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ३० हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे नातेपुते पोलीस ठाण्यातील दोन आणि मोहोळ पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास नातेपुते पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!