क्राईम

‘उर्वरित १० हजार’च्या जाळ्यात अडकला तलाठी; सापळ्यात उघडकीस धक्कादायक व्यवहार!

‘उर्वरित १० हजार’च्या जाळ्यात अडकला तलाठी; सापळ्यात उघडकीस धक्कादायक व्यवहार!

सोलापूर (प्रतिनिधी):- मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी तब्बल ९९ हजार रुपयांची लाच ठरवून त्यातील उर्वरित १० हजार रुपये स्वीकारताना तलाठी रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सुदर्शन रमेश जाधव या तलाठ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जाळ्यात अडकवले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाफळे (ता. मोहोळ) येथे मुरूम वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडण्यात आले होते. या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी संबंधित तलाठ्याने तक्रारदार व इतर दोन ट्रॅक्टर मालकांकडून प्रत्येकी ३३ हजार रुपये अशी एकूण ९९ हजार रुपयांची मागणी केली होती.

यातील दोन ट्रॅक्टर मालकांनी प्रत्येकी ३३ हजार रुपये देत एकूण ६६ हजार रुपये दिले होते. तक्रारदार राजकिरण सावंत यांनी त्यावेळी २३ हजार रुपये दिले होते. मात्र, उर्वरित १० हजार रुपये देणे बाकी असल्याने तलाठ्याने ते पुढील दिवशी (२८ मार्च) देण्यास सांगितले.

दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी करून सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे २८ मार्च रोजी तक्रारदाराकडून उर्वरित १० हजार रुपये स्वीकारताना तलाठी सुदर्शन जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी रविंद्र लांभाते यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली असून, तपास प्रशांत चौगुले करत आहेत. माढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम ७ व ७अ नुसार कारवाई होणार आहे.

एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

*महत्त्वाचे आवाहन*

कोणताही शासकीय अधिकारी किंवा एजंट कामासाठी लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!