शेवटच्या क्षणी निर्णय बदलला; केदारांना आरोग्य-शिक्षण, चिवडशेट्टींच्या नाराजीने जल्लोषच थांबला
बिनविरोध निवडीतही नाट्यमय वळण; ZP मध्ये चर्चेचा विषय ठरली खातेवाटप

शेवटच्या क्षणी निर्णय बदलला; केदारांना आरोग्य-शिक्षण, चिवडशेट्टींच्या नाराजीने जल्लोषच थांबला
बिनविरोध निवडीतही नाट्यमय वळण; ZP मध्ये चर्चेचा विषय ठरली खातेवाटप
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा परिषदेत विविध विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सर्व पदांवर बिनविरोध निवड झाली. मात्र, खातेवाटपातील बदलामुळे निर्माण झालेल्या नाराजीमुळे ही प्रक्रिया विशेष चर्चेत राहिली. कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती झालेले रामाप्पा चिवडशेट्टी यांच्या नाराजीने संपूर्ण वातावरणावर छाप पाडली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. सकाळी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर दुपारी निवड जाहीर करण्यात आली. सर्व पदांसाठी एकच अर्ज आल्याने सर्व निवडी बिनविरोध झाल्या.
समितीनिहाय सभापती खालीलप्रमाणे
समाजकल्याण विभाग – संस्कृती सातपुते
महिला व बालकल्याण विभाग – अमृता वाघे
कृषी व पशुसंवर्धन विभाग – रामाप्पा चिवडशेट्टी
आरोग्य व शिक्षण विभाग – चेतनसिंह केदार
अर्थ व बांधकाम विभाग – इंद्रजीत पवार
सभापती निवडीपूर्वीच रामाप्पा चिवडशेट्टी यांना आरोग्य व शिक्षण समितीचे सभापतीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यांच्या समर्थकांनी शंभर हलग्या, बँजो आणि फटाक्यांसह जल्लोषाची तयारी केली होती.
मात्र, अंतिम क्षणी खातेवाटपात बदल झाला आणि आरोग्य व शिक्षण समितीचे सभापतीपद चेतनसिंह केदार यांना देण्यात आले. चिवडशेट्टी यांना कृषी व पशुसंवर्धन समिती देण्यात आली.
हा निर्णय जाहीर होताच चिवडशेट्टी यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसून आली. त्यांनी टेबलावर हात आपटत नाराजी व्यक्त केली आणि सत्कारानंतर ग्रुप फोटो टाळून सभागृहाबाहेर निघून गेले.



चिवडशेट्टी यांना आरोग्य-शिक्षण खाते मिळेल याखात्रीने समर्थकांनी मोठ्या जल्लोषाची तयारी केली होती. मात्र, खाते बदलल्यानंतर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी “हलगी वाजवू नका” असे आदेश दिल्याने एकही हलगी वाजली नाही, ना फटाके फुटले.
पूर्ण सत्ता भाजपकडे असूनही जल्लोष साधेपणाने पार पडला, यामागे चिवडशेट्टी यांच्या नाराजीचा प्रभाव असल्याची चर्चा आहे.
या निवड प्रक्रियेस पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते, पक्षनेत्या रश्मी बागल उपस्थित होते.
तसेच प्रशासनाकडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक प्रक्रियेसाठी) गणेश निराळी उपस्थित होते.
निवडीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नव्या सभापतींचा सत्कार करून त्यांना मार्गदर्शन केले.
“सर्व सभापती सुशिक्षित आहेत. काम करताना पारदर्शकता ठेवा, जनतेचा विश्वास जपा आणि कोणत्याही प्रकारची टीका होणार नाही, अशी कामगिरी करा,” असा सल्ला त्यांनी दिला.
आरोग्य व शिक्षण समिती मिळाल्यानंतर चेतनसिंह केदार आनंदी दिसत होते. ते या खात्यासाठी आग्रही होते, अशी चर्चा होती.
तर दुसरीकडे चिवडशेट्टी नाराज अवस्थेत बाहेर पडले. त्यांच्या समर्थकांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते.
जिल्हा परिषदेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून सर्व पदांवर आपली पकड मजबूत केली आहे. विविध तालुक्यांना प्रतिनिधित्व देत संतुलन साधण्याचा प्रयत्न झाला असला तरी, खातेवाटपातील बदलामुळे निर्माण झालेली नाराजी ही या निवडीतील ठळक बाब ठरली.
आता नव्या सभापतींच्या कामगिरीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



