राजकारण

दलित चळवळीतील सोलापूरची राजकन्या ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर वर्णी

सोलापूरच्या राजकारणात आनंदाचे वातावरण

दलित चळवळीतील सोलापूरची राजकन्या ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर वर्णी

सोलापूरच्या राजकारणात आनंदाचे वातावरण

सोलापूर : शिवसेना (शिंदे गट) कडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्यांच्या उमेदवारीमुळे सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वाघमारे यांच्या उमेदवारीची सध्या राज्यभर चर्चा होत आहे.

सोलापूर शहरातील एका झोपडपट्टीत गरीब कुटुंबात जन्मलेल्या ज्योती वाघमारे यांनी लहानपणापासूनच संघर्षमय जीवन जगले. त्यांच्या आई-वडिलांनी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. अशा परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची ओढ कायम ठेवत शालेय शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन त्यांनी दलित चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.

पुढे त्यांनी एम.ए. (इंग्रजी) ही पदवी संपादन करत शिवाजी विद्यापीठातून मागासवर्गीय मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे सोलापूर शहराच्या शैक्षणिक इतिहासात त्यांनी एक वेगळा मानाचा टप्पा गाठला.

दरम्यान, त्यांच्या वडिलांना माजी आमदार व कॉम्रेड नेते आदम मास्तर यांच्या माध्यमातून नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनही आले. त्यामुळे वाघमारे कुटुंबाचा सामाजिक व राजकीय क्षेत्राशी अधिक जवळचा संबंध निर्माण झाला.

ज्योती वाघमारे यांच्या प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे त्यांची सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्राध्यापिका म्हणून काम करताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.

यानंतर त्यांनी सक्रियपणे राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. शिवसेना (शिंदे गट) चे नेते व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या म्हणून नियुक्ती केली. या पदावर काम करताना त्यांनी राज्यभर दौरे करून विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांच्या या कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दलित चळवळीतून पुढे आलेल्या एका कार्यकर्त्याला संसदेत प्रतिनिधित्व मिळण्याची संधी मिळाल्याने सोलापूरसह राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!