महाराष्ट्र

सावकारीच्या जाचातून सुटका नाहीच; चंद्रपूरमध्ये कर्जासाठी शेतकऱ्याची किडनी विक्री – महाराष्ट्र हादरवणारी मिंथुरची घटना

सावकारीच्या जाचातून सुटका नाहीच; चंद्रपूरमध्ये कर्जासाठी शेतकऱ्याची किडनी विक्री – महाराष्ट्र हादरवणारी मिंथुरची घटना

चंद्रपूर (प्रतिनिधी):- माणुसकीला काळिमा फासणारी आणि राज्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकाराने थेट शेतकऱ्यालाच किडनी विकायला भाग पाडल्याचा अमानवी प्रकार उघडकीस आला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात घडलेल्या या घटनेने बळीराजाच्या वेदना पुन्हा एकदा समोर आणल्या असून प्रशासन आणि शासनाच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणातील पीडित शेतकरी रोशन सदाशिव कुडे हे मिंथुर गावचे रहिवासी आहेत. चार एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुडे यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला. शेतीत अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये कर्ज घेतले. मात्र दुर्दैवाने खरेदी केलेल्या गाई मरण पावल्या आणि शेतीही फसली. कर्जाचा डोंगर वाढतच गेला.

सावकारांकडून सुरू झालेल्या जाचामुळे कुडे यांनी कर्जातून मुक्त होण्यासाठी दोन एकर जमीन, ट्रॅक्टर तसेच घरातील साहित्य विकले. तरीही कर्ज फिटले नाही. भरमसाठ आणि बेकायदेशीर व्याजामुळे एक लाखांचे कर्ज तब्बल ७४ लाखांवर गेल्याचा आरोप कुडे यांनी केला आहे. एका लाखावर दिवसाला दहा हजार रुपये व्याज आकारले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, कर्ज दिलेल्या एका सावकाराने कुडे यांना किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटमार्फत त्यांना कोलकाता येथे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्यावर कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया करून किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाख रुपयांना विकली, मात्र तरीही कर्जातून सुटका झाली नाही.

अन्याय झाला की सामान्य माणूस पोलीस ठाण्याचा उंबरठा ओलांडतो. मात्र कुडे यांना तिथेही न्याय मिळाला नाही. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली, पण कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती, तर हा दुर्दैवी प्रसंग टाळता आला असता, अशी भावना कुडे यांनी व्यक्त केली.

आजही सावकारांकडून पैशासाठी तगादा सुरूच आहे. कर्जासाठी किडनी गेली, जमीन-वस्तू विकल्या, तरीही हातात काहीच उरलेले नाही. अखेर हताश झालेल्या रोशन कुडे यांनी मंत्रालयासमोर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

या घटनेमुळे राज्यातील सावकारी, बेकायदेशीर व्याजवसुली आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बळीराजाच्या वेदना पाहून दगडालाही पाझर फुटेल; मात्र सरकार आणि प्रशासनाला हे आभाळाएवढे दुःख कधी दिसणार, असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!