सोलापूर

२८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; सोलापूर जिल्ह्यात ३.३० लाखांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब

२,५३५ लसीकरण केंद्रे सज्ज; डीएचओ डॉ सतीश कोपुरवाड यांचे पालकांना सहकार्याचे आवाहन

२८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; सोलापूर जिल्ह्यात ३.३० लाखांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब

२,५३५ लसीकरण केंद्रे सज्ज; डीएचओ डॉ सतीश कोपुरवाड यांचे पालकांना सहकार्याचे आवाहन

सोलापूर : पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, २८ जून २०२६ रोजी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पाच वर्षांखालील ३ लाख ३० हजार ५२९ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने निश्चित केले आहे.

 

भारताने सन २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळविला असून गेल्या १३ वर्षांत देशात पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. हा दर्जा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ लस पोहोचविणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यात ग्रामीण भागात २,३३० आणि शहरी भागात २०५ अशा एकूण २,५३५ लसीकरण केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.

आरोग्य विभागाने विशेषतः स्थलांतरित मजूर, विटभट्ट्या, साखर कारखाने, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, फिरस्ती कुटुंबे आणि दुर्गम भागातील बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष नियोजन केले आहे. अशा ठिकाणी मोहिमेपूर्वीच मोबाईल पथकांद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.

मोहीम यशस्वी करण्यासाठी बूथनंतर पुढील ३ आणि ५ दिवस घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांना पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. नवजात बालके आणि आजारी बालकांनाही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार लस दिली जाणार आहे.

मोहीमेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी पोस्टर्स, बॅनर्स, मायकींग, वृत्तपत्रे, केबल टीव्ही, आकाशवाणी तसेच शालेय प्रभातफेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला पूर्वसूचना म्हणून स्लिपचे वितरणही केले जाणार आहे.

अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येणार असून वीज मंडळ, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे प्रशासन आणि माहिती विभागालाही विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ सतीश कोपुरवाड यांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे की, २८ जून रोजी आपल्या घरातील पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओ लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत. यापूर्वी कितीही वेळा पोलिओ लस घेतली असली तरी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेतील डोस देणे अत्यावश्यक आहे. तसेच एखादे बालक २८ जून रोजी परगावी, नातेवाईकांकडे किंवा प्रवासात असल्यास पालकांनी चिंता करू नये. अशा बालकांसाठी आरोग्य विभागाची पथके मोहिमेनंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी घरभेटी देऊन पोलिओ लसीचे डोस देणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकही पाच वर्षांखालील बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही डीएचओ सतीश कोपरवाड यांनी केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!