नरेंद्र काळे महापौर शर्यतीतून बाहेर! देशमुख जाधव की कोंड्याल सोलापूरकरांमध्ये जोरदार चर्चा

नरेंद्र काळे महापौर शर्यतीतून बाहेर! देशमुख जाधव की कोंड्याल सोलापूरकरांमध्ये जोरदार चर्चा
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या शर्यतीत मोठा आणि निर्णायक बदल घडला आहे. महापौरपदाचे प्रमुख दावेदार मानले जात असलेले नरेंद्र काळे हे या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडले असून, पुणे येथे विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत त्यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे सोलापूर महापालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

नरेंद्र काळे यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर महापौरपदासाठी आता तीन नावे चर्चेत आली असून, किरण देशमुख, अनंत जाधव आणि विनायक कोंड्याल हे तिघे प्रमुख दावेदार म्हणून पुढे आले आहेत. यापैकी कोणाला महापौरपदाची संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता आणि चर्चा सुरू आहे.
महापालिका गट नेतेपद ही महापालिकेतील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. या पदावरून प्रशासन व सत्ताधारी गटामधील समन्वय, धोरणात्मक निर्णय आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी पार पाडली जाते. त्यामुळे नरेंद्र काळे यांची भूमिका आता अधिक प्रभावी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या महापौरपदावर अखेर कोण विराजमान होणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



