अक्षता सोहळ्यानंतर मंदिर परिसर झळाळला; जयोस्तुते फाउंडेशनच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक
अक्षता सोहळ्यानंतर मंदिर परिसर झळाळला; जयोस्तुते फाउंडेशनच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूरच्या ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यानंतर भाविकांच्या गर्दीने व्यापलेला श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर अवघ्या काही तासांत स्वच्छ व नीटनेटका करण्यात आला. हे शक्य झाले जयोस्तुते फाउंडेशनच्या शिस्तबद्ध व नियोजनबद्ध स्वच्छता अभियानामुळे.
अक्षता सोहळा संपताच जयोस्तुते फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ कामाला सुरुवात केली. संमती कट्टा, होम कट्टा तसेच मंदिर परिसरातील रस्त्यांवर पडलेले प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, फुलांचे अवशेष व अन्य कचरा गोळा करून स्वतंत्र स्वरूपात वर्गीकरण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे उरलेला अक्षतांचा तांदूळ वेगळा करून तो पक्ष्यांच्या खाद्यासाठी सुरक्षित ठेवण्यात आला, तर इतर कचरा महापालिकेच्या स्वच्छता वाहनामार्फत योग्य ठिकाणी पाठवण्यात आला.
अवघ्या तीन तासांत संपूर्ण परिसर पूर्ववत स्वच्छ झाल्याने, बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी, मंदिर प्रशासन तसेच भाविकांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी जयोस्तुते फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे आणि शिस्तीचे विशेष कौतुक केले.
या स्वच्छता मोहिमेत नीलमनगर, कलावतीनगर, माशाळेनगर परिसरातील सुमारे ८० तरुण-तरुणी तसेच विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानानंतर सर्व स्वयंसेवकांना श्री शांतय्या स्वामी यांच्या हस्ते उसाचा रस देऊन सत्कार करण्यात आला.
या उपक्रमामुळे धार्मिक कार्यक्रम आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत, हा सकारात्मक संदेश समाजात पोहोचल्याचे मत श्री सिद्धेश्वर भक्त मंडळींनी व्यक्त केले.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जयोस्तुते फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, पर्यावरण संरक्षण गतिविधी, समृद्धी सेवा संस्था, जय हिंद तरुण मंडळ यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी परिश्रम घेतले. भविष्यातही पर्यावरणपूरक, समाजोपयोगी आणि जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.



