विधानपरिषदेत खळबळ परिवहन विभागातील बदल्यांसाठी १६५ कोटींची मागणी? अनिल परब यांचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्यावर गंभीर आरोप
विधानपरिषदेत खळबळ परिवहन विभागातील बदल्यांसाठी १६५ कोटींची मागणी? अनिल परब यांचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई (प्रतिनिधी):- ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराचा गंभीर मुद्दा उपस्थित करत अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्याविरोधात खळबळजनक आरोप केले आहेत. परिवहन विभागातील ३३१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा परब यांनी सभागृहात केला.
परब यांच्या,म्हणण्यानुसार, या कथित मागणीमुळे त्रस्त झालेल्या २४५ अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालय कडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. ही बाब केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरती मर्यादित नसून, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला हादरवणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनिल परब यांनी आरोप केला की, “माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे, मला कोणीही रोखू शकत नाही,”
अशा शब्दांत भरत कळसकर अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते. या तथाकथित ‘ब्रह्मास्त्रा’च्या जोरावरच बदल्या आणि नियुक्त्यांचा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप परब यांनी केला.
याचबरोबर, कळसकर यांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांची गुंतवणूक केली असल्याचाही आरोप परब यांनी केला. हा प्रकार आर्थिक गुन्ह्यांच्या कक्षेत येत असून, याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना परब यांनी राज्य सरकारकडे खालील मागण्या केल्या –
भरत कळसकर यांच्यावर तात्काळ निलंबन व चौकशी
कथित ‘ब्रह्मास्त्र’ नेमके कोण किंवा काय आहे, याचा खुलासा
तक्रारदार अधिकाऱ्यांना संरक्षण देणे
परिवहन विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यात अशा प्रकारचे आरोप झाल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता या आरोपांवर सरकार कोणती भूमिका घेते आणि चौकशीची दिशा काय असते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



