क्राईम

जागतिक कीर्तीचे शिल्पकार डॉ. राम वंजी सुतार यांना नवी दिल्लीत भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे शिल्पकार डॉ. राम वंजी सुतार यांना नवी दिल्लीत भावपूर्ण श्रद्धांजली

नवी दिल्ली (प्रतिनिधी):- जागतिक ख्यातीचे शिल्पकार, महाराष्ट्र भूषण डॉ. राम वंजी सुतार यांच्या निधनाने देशाच्या कला विश्वावर शोककळा पसरली असून, आज नवी दिल्लीत आयोजित श्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या सभेला सामाजिक, सांस्कृतिक व शिल्पकलेच्या क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पाठविलेले शोकसंदेश वाचून दाखवण्यात आले. या संदेशांमधून डॉ. राम सुतार यांच्या अतुलनीय शिल्पकलेचा, राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. सुतार यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. बालपणापासून शिल्पकलेतील रुची जोपासत त्यांनी केलेला संघर्ष, त्यानंतर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारखी जागतिक कीर्तीची कलाकृती तसेच मुंबईतील भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३५० फूट उंच पुतळ्याच्या निर्मितीपर्यंतचा त्यांचा थक्क करणारा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला.

निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी श्रद्धांजलीपर भाषणात सांगितले की, “महाराष्ट्रातील एका छोट्या गावातून सुरू झालेला राम सुतार यांचा जीवनप्रवास त्यांच्या श्रेष्ठ कलाविष्कारामुळे जागतिक स्तरावर पोहोचला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ही कलाकृती त्यांच्या महान कर्तृत्वाची साक्ष देणारी आहे.”

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने संचालक हेमराज बागुल यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. “राम सुतार यांचे संपूर्ण आयुष्य कलेला समर्पित होते. त्यांच्या निधनाने भारतीय कला विश्वाला जागतिक स्तरावर गौरवास्पद ओळख मिळवून देणारा एक महान कलावंत हरपला आहे,” असे त्यांनी नमूद केले.

सभेत उपस्थित मान्यवरांनी विविध आठवणी सांगत डॉ. राम वंजी सुतार यांच्या शिल्पकलेतील योगदानाला उजाळा दिला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

डॉ. राम वंजी सुतार यांचे नाव भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात अजरामर राहील, अशी भावना उपस्थितांनी श्रद्धांजली सभेत व्यक्त केली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!