एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे; सायबर चोरांच्या जाळ्यात अडकू नका!
बनावट पोलिस अधिकारी, गुंतवणुकीचे आमिष आणि संशयास्पद लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा

एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे; सायबर चोरांच्या जाळ्यात अडकू नका!
बनावट पोलिस अधिकारी, गुंतवणुकीचे आमिष आणि संशयास्पद लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा
सोलापूर, दि. २४ : डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे नवनवे मार्ग अवलंबले जात आहेत. एका संशयास्पद लिंकवर क्लिक करणे, अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगणे किंवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करणे, यामुळे नागरिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहा, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका आणि सायबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले.
सोलापूर शहर पोलिस आयुक्तालय आणि क्राइम पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस आयुक्तालयात आयोजित सायबर जनजागृती कार्यशाळेत पत्रकारांना ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला शहरातील सुमारे ८० पत्रकारांनी सहभाग नोंदविला.
यावेळी पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने आणि क्राइम पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल भांगे उपस्थित होते. सायबर तज्ज्ञ अविनाश पाटील आणि महिला पोलिस अंमलदार प्रांजली काळे यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

सायबर गुन्हेगार नागरिकांना मानसिक दबावाखाली आणून त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत. बनावट पोलिस अधिकारी किंवा तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवणे, व्हिडिओ कॉलद्वारे चौकशीचा बनाव करणे आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पैशांची मागणी करणे, असे प्रकार घडत आहेत.
तसेच शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढले जाते. गॅस बिल भरणे, बिल थकीत असल्याचे सांगणे किंवा सेवा बंद होण्याची भीती दाखविणारे बनावट संदेश पाठवूनही फसवणूक केली जाते. इन्स्टंट लोन ॲपच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मिळवून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकारही समोर येत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
• संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा •
मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक, संदेश किंवा व्हॉट्सॲपवरील संशयास्पद ऑफर यांच्याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी. बँकेचा ओटीपी, पासवर्ड, एटीएम किंवा कार्डची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाइलमध्ये रिमोट ॲक्सेस ॲप इन्स्टॉल करू नये किंवा स्क्रीन शेअर करू नये.
मोठ्या परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या गुंतवणूक योजनांची अधिकृत माहिती तपासल्याशिवाय पैसे गुंतवू नयेत. केवळ विश्वासार्ह दिसणारा संदेश, लोगो किंवा गणवेश पाहून संबंधित व्यक्ती खरी असल्याचे गृहीत धरू नये, असा सल्लाही कार्यशाळेत देण्यात आला.
• फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर संपर्क साधा •
सायबर किंवा आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वेळ न घालवता १९३० या राष्ट्रीय सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तसेच भारत सरकारच्या “राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर” (https://cybercrime.gov.in/) तक्रार नोंदवावी.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील यांनी तातडीने तक्रार नोंदविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. फसवणुकीनंतर लवकर तक्रार केल्यास संबंधित व्यवहाराचा मागोवा घेऊन रक्कम रोखण्याची किंवा गोठविण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्यानंतर संकोच न करता त्वरित पोलिसांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित या कार्यशाळेत पत्रकारांना सुरक्षित डिजिटल व्यवहार, फसवणुकीचे बदलते प्रकार आणि नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांनी केले. सहभागी पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. इम्रान सगरी यांनी आभार मानले.



