एसटीचा प्रवाशांना मोठा दिलासा! ‘आवडेल तेथे प्रवास’ पास आता ऑनलाइन; आगाराच्या फेऱ्या वाचणार
अधिकृत संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर सुविधा; मोबाईलमधील PDF किंवा प्रिंट पास दाखवता येणार, QR कोडने होणार तपासणी

एसटीचा प्रवाशांना मोठा दिलासा! ‘आवडेल तेथे प्रवास’ पास आता ऑनलाइन; आगाराच्या फेऱ्या वाचणार
अधिकृत संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर सुविधा; मोबाईलमधील PDF किंवा प्रिंट पास दाखवता येणार, QR कोडने होणार तपासणी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतील पास काढण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना पास घेण्यासाठी आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने अर्ज व पास काढण्याची गरज राहणार नाही. नव्या ऑनलाइन सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी परिपत्रक जारी करून ४ दिवस आणि ७ दिवसांच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू केली आहे. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासोबतच मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनही प्रवाशांना हा पास उपलब्ध होणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने पास काढल्यानंतर त्याची प्रत प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमधील PDF स्वरूपात प्रवासावेळी दाखवता येणार आहे. त्यामुळे कागदी पास जवळ बाळगण्याची सक्ती राहणार नसून, मोबाईलमध्ये उपलब्ध असलेला पासही प्रवासासाठी वापरता येईल.
• QR कोडमुळे तपासणी होणार सुलभ •
ऑनलाइन पद्धतीने जारी करण्यात येणाऱ्या पासवर QR कोड देण्यात येणार आहे. प्रवासाच्या वेळी संबंधित एसटी कर्मचारी हा QR कोड स्कॅन करून पासची वैधता तपासणार आहेत. त्यामुळे पास तपासणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होण्याची अपेक्षा आहे.
‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत राज्यातील विविध भागांत प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः सुट्टी, पर्यटन किंवा सलग काही दिवस एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगारात रांगेत उभे राहण्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने पास घेता येणार असल्याने प्रवासाचे नियोजन अधिक सोपे होणार आहे.
एसटीच्या डिजिटल सेवांच्या विस्तारातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा असून, प्रवाशांना अधिक सुलभ आणि आधुनिक सेवा देण्याच्या दृष्टीने ऑनलाइन पास प्रणाली सुरू करण्यात आली आहे.



