योगातून निरोगी जीवनाचा संदेश; निर्मलाताई ठोकळ प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
विद्यार्थ्यांनी घेतला योग, प्राणायाम आणि ध्यानधारणेचा अनुभव

योगातून निरोगी जीवनाचा संदेश; निर्मलाताई ठोकळ प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
विद्यार्थ्यांनी घेतला योग, प्राणायाम आणि ध्यानधारणेचा अनुभव
सोलापूर : इंदिरा ज्ञानवर्धिनी, सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी योगाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने विविध योग व प्राणायाम उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासने व प्राणायामाचे सादरीकरण केले. कु. प्रणिती सांगलीकर आणि कु. रक्षिता हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ओंकार साधना, सूर्यनमस्कार, कपालभाती, भ्रामरी, शितली, अनुलोम-विलोम यांसह वज्रासन, भुजंगासन आणि शवासन यांसारख्या विविध योगासनांचा सराव केला.

यावेळी प्रत्येक आसन आणि प्राणायामाचे आरोग्यदायी फायदे, मानसिक शांतता, एकाग्रता वाढविण्यातील भूमिका तसेच दैनंदिन जीवनातील उपयुक्तता याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी आणि संतुलित जीवनासाठी योगाचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. विपीन ठोकळ, उपाध्यक्ष सचिन ठोकळ तसेच संचालिका शिल्पाताई ठोकळ यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. या उपक्रमासाठी प्राचार्य डी. डी. गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी सहशिक्षक ए. पी. सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आणि नियमित सरावाचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पी. एच. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



