क्रीडा विभागाच्या योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन : १० जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याची मुदत
क्रीडा विभागाच्या योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन : १० जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याची मुदत
सोलापूर, दि. 2 (जिमाका):- राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणांतर्गत विद्यार्थी व तरुणांसाठी व्यायामशाळा व क्रीडांगणे विकसित करण्याच्या विविध योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये व्यायामशाळा विकास अनुदान योजना व क्रीडांगण विकास अनुदान योजना समाविष्ट आहेत.
जिल्हा वार्षिक योजनेतून व्यायामशाळा विकास (सर्वसाधारण व विशेष घटक) योजनेअंतर्गत किमान १००० चौ. फूट जागा असणे आवश्यक आहे. त्यापैकी ५०० चौ. फूट चटई क्षेत्रासह स्वतंत्र व्यायामगृह बांधण्यासाठी कमाल रु. १४ लाख अनुदान उपलब्ध आहे. तसेच अत्याधुनिक व्यायाम साहित्य पुरवठा व खुली व्यायामशाळा (ओपन जिम) उभारण्यासाठी कमाल रु. ७ लाख अनुदानाची तरतूद आहे.
या योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय रुग्णालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, क्रीडा विभागाच्या विविध समित्या, पोलीस कल्याण निधी, शासकीय कार्यालये व जिमखाना यांना पात्रतेनुसार अर्ज करता येणार आहे.
क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत क्रीडांगण समपातळीकरण, २०० मीटर धावनमार्ग तयार करणे, तारेचे कुंपण उभारणी, प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह व चेंजिंग रूम बांधणे, पाणीपुरवठा सुविधा, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, फ्लडलाईट सुविधा निर्माण करणे, प्रेक्षक गॅलरी व आसन व्यवस्था व त्यावर शेड तयार करणे, क्रीडांगणा भोवती ड्रेनेज व्यवस्था इत्यादी कामांसाठी कमाल रु. ७ लाख अनुदान देण्यात येणार आहे. तसेच क्रीडा साहित्य खरेदीसाठी कमाल रु. ३ लाख अनुदान उपलब्ध आहे.
या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित संस्थेकडे स्वतःच्या मालकीची अथवा किमान ३० वर्षांच्या नोंदणीकृत भाडेपट्टा कराराद्वारे, बक्षीसपात्र, दानपत्रान्वये, खरेदी खत, प्राप्त झालेली जागा असणे आवश्यक आहे.
तरी संबंधित पात्र संस्थांनी सर्वसाधारण व विशेष घटक योजनांसाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिनांक १० जुलै २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी केले आहे.
*******



