महाराष्ट्र

समृद्ध पंचायत राज अभियानासाठी सीईओ कुशल जैन यांचा नांदेड दौरा; ग्रामविकास कामांची प्रत्यक्ष पाहणी

मुखेड व देगलूर तालुक्यातील गावांना भेटी; शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य सुविधांचे मूल्यमापन

समृद्ध पंचायत राज अभियानासाठी सीईओ कुशल जैन यांचा नांदेड दौरा; ग्रामविकास कामांची प्रत्यक्ष पाहणी

मुखेड व देगलूर तालुक्यातील गावांना भेटी; शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य सुविधांचे मूल्यमापन

नांदेड (प्रतिनिधी ) :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राज्यभर सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या मूल्यमापन प्रक्रियेत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नेतृत्वाखालील समितीने नांदेड जिल्ह्यातील विविध गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. १ जूनपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची सखोल तपासणी करण्यात येत आहे.

जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांचा समावेश आहे. या समितीने नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील कामळजा तसेच देगलूर तालुक्यातील अंतापूर, येरगी आणि अंबुलगा या गावांना भेट देत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या कामांचे मूल्यमापन केले.

समितीने ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्रे, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, आरोग्य केंद्रे तसेच गावातील स्वच्छता आणि विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित ग्रामपंचायतींकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करून प्रत्यक्ष कामांशी त्यांची पडताळणी करण्यात आली.

दौऱ्यादरम्यान सीईओ कुशल जैन यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. येरगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थिनीने विविध कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने प्रभावित झालेल्या जैन यांनी विद्यार्थिनीचे विशेष कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थिनीच्या हस्ते सीईओ कुशल जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांचा सत्कार करण्यात आला. दौऱ्यावेळी संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रत्यक्ष पाहणी व मूल्यमापनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!