महाराष्ट्र

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; NCL व EWS प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत

पोहोच पावती किंवा हमीपत्राच्या आधारे प्रवेश निश्चित; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा निर्णय

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; NCL व EWS प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत

पोहोच पावती किंवा हमीपत्राच्या आधारे प्रवेश निश्चित; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : राज्यातील इयत्ता अकरावीच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सुरू असलेल्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एनसीएल (Non-Creamy Layer) आणि ईडब्ल्यूएस (Economically Weaker Section) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. संबंधित प्रमाणपत्रे अद्याप उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना पोहोच पावती किंवा हमीपत्राच्या आधारे प्रवेश देण्यात यावा आणि प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात यावी, असे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.

अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी पात्रता असूनही एनसीएल किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र तयार होण्यास विलंब होत असल्याने त्यांचा प्रवेश रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

निर्णयानुसार, विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पोहोच पावती किंवा संबंधित हमीपत्र असल्यास त्यांना प्रवेश नाकारला जाणार नाही. प्रवेश निश्चित केल्यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार असून हजारो विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे.

शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे एनसीएल आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेश अधिक सुलभ होणार असून, केवळ प्रमाणपत्राच्या विलंबामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!