सोलापूर महापालिकेचा नवा उपक्रम; नगरसेवकांना अधिकृत ओळखपत्र व बॅच बिल्ले वितरण
बैठका, दौरे आणि प्रशासकीय कामकाजात लोकप्रतिनिधींची ओळख होणार अधिक सुलभ

सोलापूर महापालिकेचा नवा उपक्रम; नगरसेवकांना अधिकृत ओळखपत्र व बॅच बिल्ले वितरण
बैठका, दौरे आणि प्रशासकीय कामकाजात लोकप्रतिनिधींची ओळख होणार अधिक सुलभ
सोलापूर :- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील लोकप्रतिनिधींना अधिकृत ओळख प्रदान करण्याच्या उद्देशाने आज नगरसेवक व नगरसेविकांना ओळखपत्र आणि बॅच बिल्ल्यांचे वितरण करण्यात आले. महापालिका मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते या ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिकेच्या विविध बैठका, शासकीय कार्यक्रम, विकासकामांची पाहणी तसेच प्रशासकीय कामकाजादरम्यान नगरसेवकांची अधिकृत ओळख सहज व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रत्येक नगरसेवकाला नाव, पद आणि अधिकृत माहिती असलेले ओळखपत्र तसेच महापालिकेचा लोगो असलेले बॅच बिल्ले प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, “लोकप्रतिनिधी हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतात. अधिकृत ओळखपत्रामुळे त्यांच्या कार्याला शिस्त, सुसूत्रता आणि विश्वासार्हता प्राप्त होईल. नागरिकांनाही आपल्या प्रतिनिधींची ओळख सहजपणे पटेल.”

कार्यक्रमास महापालिकेचे विविध विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले होते.



