सोलापूर

‘नो व्हेईकल डे’ला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद; महापौर विनायक कोंड्याल ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

‘नो व्हेईकल डे’ला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद; महापौर विनायक कोंड्याल ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

सोलापूर :- वाढते वायू प्रदूषण, इंधनाची वाढती गरज आणि जागतिक तापमानवाढ यासारख्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि शाश्वत जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महापालिकेने प्रत्येक सोमवार ‘नो व्हेईकल डे’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली.

या उपक्रमांतर्गत महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी शक्यतो खाजगी किंवा शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई-वाहने किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनाचा काटकसरीने वापर करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

या मोहिमेला प्रत्यक्ष कृतीतून पाठिंबा देत महापौर विनायक कोंड्याल हे सोमवारी ई-बाईकवरून सोलापूर महानगरपालिकेत दाखल झाले. त्यांच्या या कृतीमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला असून पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महापौर विनायक कोंड्याल म्हणाले की, पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण मिळावे यासाठी आजपासूनच पर्यावरणपूरक सवयी आत्मसात करणे आवश्यक आहे. ‘नो व्हेईकल डे’ हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता मर्यादित नसून तो जनजागृतीचा प्रभावी संदेश आहे, असेही त्यांनी नमूद केले.

महापालिकेच्या या उपक्रमामुळे इंधन बचत, वाहतूक कोंडी कमी होणे, वायू प्रदूषणावर नियंत्रण आणि पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच शहरातील नागरिकांनीही आठवड्यातील किमान एक दिवस पर्यावरणपूरक वाहतुकीचा वापर करून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!