सोलापूर

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मिलन कल्याणशेट्टींच्या पुढाकारातून प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’

२१ मेपासून नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गुरुवार ठरणार वाहनमुक्त दिवस

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मिलन कल्याणशेट्टींच्या पुढाकारातून प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’

२१ मेपासून नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गुरुवार ठरणार वाहनमुक्त दिवस

अक्कलकोट (प्रतिनिधी):- इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी अक्कलकोट नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून येत्या २१ मे २०२६ पासून प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी आणि मुख्याधिकारी यांच्या संयुक्त पुढाकारातून हा निर्णय जाहीर करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुरुवारी खासगी वाहनांचा वापर टाळण्याचे ठरविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि काटकसरीच्या जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी दिली.

‘नो व्हेईकल डे’चा उद्देश केवळ इंधन बचत नसून वायू प्रदूषण कमी करणे, वाहतूक कोंडी रोखणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण करणे हाही आहे. आठवड्यातून एक दिवस वाहनांचा वापर कमी झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचा खर्च वाचण्यास मदत होणार असून देशाच्या इंधन साठ्यावर येणारा ताणही कमी होणार आहे.

नगरपरिषदेच्या या निर्णयामुळे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. मर्यादित स्तरावर सुरू होणारा हा उपक्रम भविष्यात व्यापक लोकचळवळ बनू शकतो, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी म्हणाले की, “नो व्हेईकल डे हा केवळ एका दिवसापुरता उपक्रम नाही, तर स्वच्छ पर्यावरण, चांगले आरोग्य आणि सुरक्षित भविष्यासाठीची सामाजिक चळवळ आहे. शहरातील नागरिकांनीही शक्य त्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे.”

अक्कलकोट नगरपरिषदेच्या या निर्णयाचे शहरातून स्वागत होत असून पर्यावरण संरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतलेल्या सकारात्मक पुढाकाराचे कौतुक केले जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!