वादळी पावसाने ऊस शेतीचे मोठे नुकसान; राम सातपुतेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरूनच मुख्यमंत्र्यांकडे मांडली शेतकऱ्यांची व्यथा
बाबुळगावच्या शेतातून थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

वादळी पावसाने ऊस शेतीचे मोठे नुकसान; राम सातपुतेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरूनच मुख्यमंत्र्यांकडे मांडली शेतकऱ्यांची व्यथा
बाबुळगावच्या शेतातून थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन
बाबुळगाव (ता. माळशिरस) : माळशिरस तालुक्यात झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दहा-दहा एकरांवरील ऊस जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी बाबुळगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकल्यानंतर रामभाऊ सातपुते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान त्यांच्या निदर्शनास आणून देत तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना देऊन नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तात्काळ करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. तसेच पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येईल,असे आश्वासन रामभाऊ सातपुते यांना दिले.
वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी ऊस पिके आडवी पडली असून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा, अशी मागणी परिसरातून होत आहे. दरम्यान, रामभाऊ सातपुते यांनी प्रशासनाने विलंब न करता पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या पाहणीमुळे आणि थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



