होटगी आयटी पार्कचा फुगा फुटणार? RTI मधून धक्कादायक वास्तव उघड
घोषणांचा खेळ की विकासाचा धक्का? सोलापूर आयटी पार्कवर प्रश्नचिन्ह

होटगी आयटी पार्कचा फुगा फुटणार? RTI मधून धक्कादायक वास्तव उघड
घोषणांचा खेळ की विकासाचा धक्का? सोलापूर आयटी पार्कवर प्रश्नचिन्ह
सोलापूर:- सोलापूरच्या विकासाचे ‘गेमचेंजर’ म्हणून मांडला गेलेला होटगी रोड आयटी पार्क प्रकल्प आता गंभीर संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. माहितीच्या अधिकारातून (RTI) समोर आलेल्या अधिकृत कागदपत्रांनी या प्रकल्पाच्या पायाभूत दाव्यांनाच हादरा दिला असून, “हा प्रकल्प खरोखरच सुरू होणार आहे की फक्त कागदावरच राहणार?” असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे.
*वीजपुरवठाच नाही – प्रकल्प कसा उभा राहणार?*
सोलापूर विकास मंचाने केलेल्या RTI अर्जातून उघड झाले की, NTPC कडून आयटी पार्कसाठी कोणताही औपचारिक करारच झालेला नाही.
ना MoU, ना Power Supply Agreement, ना Letter of Intent – म्हणजेच प्रकल्पासाठी आवश्यक असलेला सर्वात महत्त्वाचा घटक “वीज” अजून कागदावरही निश्चित नाही.
अधिक धक्कादायक म्हणजे, NTPC ने स्पष्ट केले आहे की ते केंद्र सरकारच्या धोरणानुसारच वीजपुरवठा करते आणि स्वस्त दरात वीज देण्याचा कोणताही विशेष प्रस्ताव अस्तित्वात नाही.
दुसरीकडे, विमानतळ प्राधिकरण (AAI) कडून मिळालेल्या माहितीनुसार,
सोलापूर विमानतळासाठी ILS किंवा नाईट लँडिंगसाठी कोणताही प्रस्तावच आलेला नाही.
यामुळे भविष्यात आयटी पार्कमध्ये उंच इमारती उभारण्यास परवानगी मिळेल का, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
IT पार्कसाठी आवश्यक असलेली आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभी राहण्यापूर्वीच नियामक अडथळे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
होटगी परिसराची सध्याची स्थितीही चिंताजनक आहे.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामुळे,
* मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
* परिसरात दुर्गंधी
* औद्योगिक हालचालींमुळे वातावरणावर परिणाम
अशा परिस्थितीत उच्च दर्जाच्या IT कंपन्या या भागात येण्यास उत्सुक राहतील का, याबाबत शंका व्यक्त होत आहे.
सोलापूर विकास मंचाने वारंवार सांगितले आहे की,
होटगी रोडऐवजी हिरज येथील जागा IT पार्कसाठी अधिक योग्य आहे.
तसेच, होटगी परिसरात जमीन दर कृत्रिमरीत्या वाढवले जात असल्याचा आरोपही समोर आला असून, संभाव्य आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे.
*बोरामणी विमानतळाची पुनरावृत्ती?*
सोलापूरकरांना अजूनही बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आठवतो, जो घोषणांपुरताच मर्यादित राहिला.
आता तशीच परिस्थिती आयटी पार्कबाबत निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
*“दिशाभूल होत आहे का?” – नागरिकांचा सवाल*
जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या घोषणांमध्ये,
* स्वस्त वीज
* सर्व सुविधा
* जलद अंमलबजावणी
यांचा उल्लेख होता. मात्र RTI मधील माहिती याला छेद देत असल्याने,
“जिल्हाधिकारी सोलापूरकरांची दिशाभूल करत आहेत का?” हा थेट सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.
*शासनाकडून स्पष्ट भूमिका आवश्यक*
सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी IT पार्क हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.
मात्र सध्याची परिस्थिती पाहता..
* वीजपुरवठा अनिश्चित
* परवानग्या प्रलंबित
* जागेची उपयुक्तता वादात
* अंमलबजावणीचा ठोस आराखडा नाही
या सगळ्यामुळे हा प्रकल्प केवळ घोषणांपुरताच राहण्याची भीती वाढत आहे.
सोलापूरकरांच्या अपेक्षांचा केंद्रबिंदू असलेला आयटी पार्क प्रकल्प आता पारदर्शकतेच्या कसोटीवर उभा आहे.
घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती आणि अधिकृत करारांची गरज आहे, अन्यथा हा प्रकल्पही इतिहासजमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.







