सोलापूर

सोलापुरात 23 ते 25 मार्च दरम्यान जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सव

सोलापुरात 23 ते 25 मार्च दरम्यान जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सव

सोलापूर :- महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत राष्ट्रीय खाद्य तेल अभियान व राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सव दि. 23 ते 25 मार्च 2026 या कालावधीत हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. महोत्सवात सुमारे 50 विविध स्टॉल्स उभारण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांची थेट विक्री होणार आहे.

महोत्सवातील प्रमुख आकर्षणांमध्ये सेंद्रीय गुळ, काकवी, इंद्रायणी तांदूळ, मंगळवेढा ज्वारी, सोलापूरी हुरडा, जांभूळ कुल्फी, ज्वारी बिस्कीट, केळी व शेवगा पावडर, विविध वाळवण पदार्थ, ड्राय भाजीपाला, मल्टीमिलेट आटा, कडक भाकरी यांचा समावेश आहे. या सर्व पदार्थांना ग्राहकांकडून मोठी मागणी अपेक्षित आहे.

यासोबतच महोत्सवामध्ये आधुनिक कृषि तंत्रज्ञानावर तज्ञांचे चर्चासत्र व परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. अन्नप्रक्रिया उद्योगातील विक्री व्यवस्थापन, विपणन कौशल्य यावरही तज्ज्ञ मार्गदर्शन देणार आहेत.

विशेष म्हणजे, या महोत्सवात विक्रेता-खरेदीदार संमेलन आयोजित करण्यात आले असून, उत्पादक व खरेदीदार यांना एकाच मंचावर आणून वार्षिक करार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी निश्चित बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमातून “शेतकरी ते ग्राहक” थेट विक्री संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व उद्योजकांनी या महोत्सवाला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!