होळी-उन्हाळ्यात रेल्वेचा मोठा निर्णय… सोलापूर विभागातून ‘या’ विशेष गाड्या धावणार जुलैपर्यंत !

होळी-उन्हाळ्यात रेल्वेचा मोठा निर्णय… सोलापूर विभागातून ‘या’ विशेष गाड्या धावणार जुलैपर्यंत !
सोलापूर (प्रतिनिधी) :- होळी सण आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे च्या सोलापूर विभागाने विशेष गाड्यांची सेवा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी साप्ताहिक आणि दैनिक विशेष गाड्यांचा कालावधी जुलै २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर–लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई (०१४३५) ही साप्ताहिक विशेष गाडी आता दर मंगळवारी १४ जुलै २०२६ पर्यंत धावणार आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई–सोलापूर (०१४३६) ही गाडी दर बुधवारी १५ जुलै २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. सोलापूर–अनकापल्ले (०१४७७) ही गाडी दर शुक्रवारी १० जुलै २०२६ पर्यंत, तर अनकापल्ले–सोलापूर (०१४७८) ही गाडी दर शनिवारी ११ जुलै २०२६ पर्यंत धावणार आहे.
याशिवाय, आधी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अधिसूचित करण्यात आलेल्या काही दैनिक अनारक्षित विशेष गाड्या आता १५ जुलै २०२६ पर्यंत सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यात सोलापूर–दौंड (०१४६१/०१४६२), सोलापूर–कलबुरगी (०१४६५/०१४६६) आणि हडपसर–हरंगुळ (०१४८७/०१४८८) या गाड्यांचा समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या विशेष गाड्यांच्या वेळा, रचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष गाड्यांसाठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट बुकिंग स्थानकांवरील काउंटर आणि RailOne अॅपद्वारेही करता येणार आहे.
प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकीटासह प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in, RailOne किंवा NTES अॅपचा वापर करण्याचेही सांगण्यात आले आहे.
ही माहिती दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जनसंपर्क क्रमांक SUR/२०२६/०२/०४ अंतर्गत सोलापूर विभागाच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केली आहे.





