राजकारण

भाजपातील वादाच्या चर्चांना विराम; प्रभाग ७ मध्ये कोठे–देशमुखांची संयुक्त ताकद

भाजपातील वादाच्या चर्चांना विराम; प्रभाग ७ मध्ये कोठे–देशमुखांची संयुक्त ताकद

सोलापूर (प्रतिनिधी) :- शहरातील राजकारणात काही काळापासून चर्चेत असलेल्या भाजपातील अंतर्गत वादाच्या वावड्यांना अखेर पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येत प्रभाग क्रमांक ७ मधील प्रचाराचा शुभारंभ केल्याने विरोधकांच्या आरोपांना प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले आहे.

प्रभाग ७ मधील भाजप प्रचाराच्या उद्घाटनावेळी दोन्ही आमदार एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. कोठे–देशमुख यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा विरोधकांकडून सातत्याने पसरवल्या जात होत्या. मात्र या संयुक्त उपस्थितीमुळे भाजपातील संघटनात्मक एकजूट ठळकपणे समोर आली आहे.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपाने ४९ नगरसेवक निवडून आणत शहराच्या राजकारणात आपली ताकद सिद्ध केली होती. त्या वेळी शहर उत्तर आणि शहर दक्षिण हे दोन आमदार भाजपाकडे होते. सध्या त्यात शहर मध्य मतदारसंघाची भर पडल्याने भाजप अधिक मजबूत स्थितीत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघात ताकद लावल्यास भाजप ७५ नगरसेवकांचा आकडा गाठू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

प्रभाग क्रमांक ७ हा आमदार देवेंद्र कोठे यांचा पूर्वीचा नगरसेवक म्हणूनचा प्रभाग असून, यावेळी त्यांच्या जागी पद्माकर उर्फ नाना काळे निवडणूक लढवत आहेत. नाना काळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आमदार कोठे यांनी यावेळी केले. भाजपच्या विकासाभिमुख धोरणांची परंपरा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख यांनीही संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप दमदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला. कोठे–देशमुख यांच्या एकत्रित प्रचारामुळे भाजपातील ऐक्य अधोरेखित झाले असून, आगामी निवडणुकीत भाजप विरोधकांसाठी आव्हान ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!