क्राईम

निवडणूक पार्श्वभूमीवर जोडभावी पेठ पोलिसांची मोठी कारवाई; स्मशानभूमीजवळून ५ नंग्या तलवारींसह आरोपी ताब्यात

निवडणूक पार्श्वभूमीवर जोडभावी पेठ पोलिसांची मोठी कारवाई; स्मशानभूमीजवळून ५ नंग्या तलवारींसह आरोपी ताब्यात

सोलापूर (प्रतिनिधी) :- पुढील महिन्यात सोलापूर शहरात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी सोलापूर शहर पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. याच अनुषंगाने जोडभावी पेठ पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई करत स्मशानभूमीजवळून पाच नंग्या तलवारींसह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे तसेच सहा. पोलीस आयुक्त पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम धारदार तलवारी घेऊन रुपाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या लिंगायत स्मशानभूमीच्या कंपाउंडजवळ येणार आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या आदेशाने पथकाने लिंगायत स्मशानभूमीजवळ सापळा रचला. दुपारच्या सुमारास संशयित इसम आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ घेराव घालून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव मल्लिनाथ गुरुलिंगप्पा निरगुडे (वय ४३, रा. भवानीपेठ जम्मावस्ती, सोलापूर) असे सांगितले.

त्याच्या ताब्यातून अंदाजे १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये म्यानसह एकूण पाच नंग्या तलवारी आढळून आल्या आहेत. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी जमावबंदी व शस्त्रबंदीचे आदेश जारी केले असताना, आरोपीने बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगून आदेशाचा भंग केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय दगडू काटे (नेमणूक – जोडभावी पेठ पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८२/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपीने ही शस्त्रे कुठून आणली, कोणाला विक्री करण्याचा त्याचा उद्देश होता का, तसेच यापूर्वी त्याने कोणाला शस्त्रांची विक्री केली आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माहडीक, पोहेकॉ खाजप्पा आरेनवरु, शीतल शिवशरण, शिवानंद लोहार, बसवराज स्वामी, दत्तात्रय काटे, अभिजीत पवार, निलेश घोगरे, विठ्ठल काळजे, सोमनाथ थिटे, दादासाहेब सरवदे आदी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असल्याची माहिती जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!