दक्षिण सोलापूर पंचायत समितीचा मोठा निर्णय; UPSC-MPSC विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक बळ
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचा मोठा निर्णय; UPSC-MPSC विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक बळ
सोलापूर (प्रतिनिधी):- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितीने महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. UPSC आणि MPSC परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा ठराव समितीच्या मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
सभापती संदीप टेळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, मार्गदर्शन वर्ग (कोचिंग) आणि इतर शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मदत दिली जाणार आहे.
या योजनेनुसार, MPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये, तर UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १० हजार रुपये प्रोत्साहनपर अर्थसहाय दिले जाणार आहे. हा प्रस्ताव सदस्य बलवान गोतसुर्वे यांनी सभेत मांडला होता, ज्याला सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत मंजुरी दिली.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार असून, अधिकाधिक युवक-युवती स्पर्धा परीक्षांकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीचा हा उपक्रम इतर भागांसाठीही आदर्श ठरू शकतो.


