सोलापूर

मानसिक छळ, धमक्या आणि तक्रारींची फाईल गहाळ; कारवाई न झाल्यास १५ डिसेंबरला जिल्हा परिषदसमोर आत्मदहनाचा इशारा

मानसिक छळ, धमक्या आणि तक्रारींची फाईल गहाळ; कारवाई न झाल्यास १५ डिसेंबरला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा

सोलापूर (प्रतिनिधी):- अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल असतानाही जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. शिक्षक प्रतिनियुक्ती प्रकरणी सप्टेंबर २०२४ मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची संपूर्ण फाईलच गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे शिक्षण विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Oplus_16908288

तक्रारदार महांतेश्वर हणमंतराव कट्टीमनी (अध्यक्ष) यांनी विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की, सदर तक्रार फाईल शिक्षणाधिकारी कार्यालयातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सहीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता, “माझ्याकडे अशी कोणतीही फाईल आलेली नाही,” असे स्पष्ट उत्तर देण्यात आले.

विशेष म्हणजे, ऑनलाईन प्रणालीत तपासणी केली असता सदर फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेच प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही फाईल नेमकी कुठे आहे? ती जाणूनबुजून दडपण्यात आली आहे का? की दोषींना वाचवण्यासाठी फाईल गायब करण्यात आली आहे? असे गंभीर सवाल उपस्थित होत आहेत.

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, अक्कलकोट तालुक्यातील अनेक महिला शिक्षिकांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्याविरोधात मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारी दाखल केल्या असून, त्या देखील अद्याप प्रलंबित आहेत. संबंधित अधिकारी तक्रारदारांना खुलेआम धमकी देत असून, “माझ्यावर कितीही तक्रारी करा, माझ्यावर काहीही कारवाई होणार नाही,” असे सांगत आमदारांचे नाव वापरून दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालयात तक्रारदारास निलंबन व बडतर्फीची धमकी देत अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक शिक्षकांनी फोनद्वारे आपली व्यथा मांडल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणासंदर्भात ऑडिओ व व्हिडीओ स्वरूपाचे पुरावे उपलब्ध असल्याचे तक्रारदाराने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, तक्रारदाराने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी दिनांक ११ डिसेंबर रोजी लेखी पत्र देत “आत्मदहन करू नये, तक्रारीवर नियमानुसार चौकशी करून कारवाई केली जाईल” असे आश्वासन दिले. मात्र तक्रारदारांचे म्हणणे आहे की, यापूर्वीही दोन ते तीन वेळा अशाच स्वरूपाची आश्वासनात्मक पत्रे देण्यात आली असून, आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. केवळ पत्र देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आणि दोषींवर कारवाई होत नसल्याने आपण आत्महत्या व आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे तक्रारदाराने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे. यानंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले आहे.

या गंभीर प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, दोषींवर कारवाई होते की तक्रारींची फाईल पुन्हा एकदा ‘गहाळ’ होते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!