सोलापूर

सोलापूर महापालिका निवडणूक 2025 साठी तयारी अंतिम टप्प्यात; आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांची मतमोजणी केंद्रे व ईव्हीएम स्ट्राँग रूमची सखोल पाहणी

सोलापूर महापालिका निवडणूक 2025 साठी तयारी अंतिम टप्प्यात; आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांची मतमोजणी केंद्रे व ईव्हीएम स्ट्राँग रूमची सखोल पाहणी

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ही पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, महानगरपालिका आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील महत्त्वाच्या निवडणूक व्यवस्थापन ठिकाणांची सखोल पाहणी केली.

या पाहणीत निर्णय अधिकारी (आरओ) क्रमांक 1 ते 8 यांच्या कार्यालयांसाठी निवडण्यात आलेल्या जागा, त्या ठिकाणची वीजपुरवठा व्यवस्था, बैठक व्यवस्था, दस्तऐवज साठवणूक कक्ष, आयटी सुविधा, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. निर्णय अधिकाऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय काम करता यावे यासाठी आवश्यक त्या तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना डॉ. ओम्बासे यांनी दिल्या.

मतदान यंत्रे (EVM–VVPAT) सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूम्सची क्षमता, डबल लॉकिंग सिस्टीम, सीसीटीव्ही कव्हरेज, 24×7 पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, प्रवेश–निर्गम मार्ग, अग्निशमन व्यवस्था यांची आयुक्तांनी सविस्तर तपासणी केली.
“सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे स्पष्ट करत कोणतीही तडजोड होणार नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मतमोजणीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि तांत्रिक व्यवस्था आवश्यक असल्याने, मतमोजणी केंद्रांमधील,टेबल मांडणी,उमेदवार व प्रतिनिधींसाठी स्वतंत्र जागा,मीडिया गॅलरी,आयटी कक्ष, प्रिंटर, वाय-फाय,पोलिस बंदोबस्त व आपत्कालीन व्यवस्था,वाहनतळ (पार्किंग),या सर्व बाबींचे नियोजन डॉ. ओम्बासे यांनी तपासून अधिक काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश दिले.

नॉर्थकोट प्रशाला, नूमवि प्रशाला, रामवाडी गोदाम आणि सिंहगड कॉलेज येथे मतदान यंत्रे, मतमोजणी कक्ष, मतदान कर्मचारी कक्ष, मार्गदर्शक फलक, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, जनरेटर, इंटरनेट सुविधा यांचा बारकाईने आढावा घेण्यात आला.
निवडणूक दिवशी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व सुविधा वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

 

या पाहणीवेळी,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त गिरीष पंडित, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, ओमप्रकाश वाघमारे, प्रदीप निकते, संदीप भोसले, गणेश कोळी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून निवडणूक तयारी अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले.
तसेच, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!