तुळजापूरात गौड कलाल समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा उत्साहात; हजारोंची उपस्थिती

तुळजापूरात गौड कलाल समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा उत्साहात; हजारोंची उपस्थिती
तुळजापूर (प्रतिनिधी):- तुळजापूर-नळदुर्ग रोडवरील पुजारी नगर येथील श्रीनाथ लॉन्स, बँक्वेट हॉल येथे बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सोलापूर, धाराशिव व लातूर जिल्हा गौड (कलाल) समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गौड (कलाल) समाज स्नेह संमेलन व राज्यस्तरीय भव्य वधू-वर सूचक मेळावा हजारोंच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
या मेळाव्यास तुळजापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, बार्शी, बीड, धारूर, वैराग, परभणी, मुंबई, पुणे तसेच परिसरातील अनेक खेड्या-पाड्यांमधून मोठ्या संख्येने वधू-वर आणि त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली. खचाखच भरलेल्या सभागृहात कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाने झाली.
त्यानंतर सर्व मान्यवरांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सरदार सवई पापांना गोड महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्यरूप सादरीकरण. भंडारी समाजासाठी ब्रिटिश काळात त्यांनी दिलेल्या योगदानाचे प्रभावी चित्रण या कार्यक्रमातून करण्यात आले. उपस्थितांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.
यानंतर सर्व जिल्ह्यांतून आलेल्या हजारो महिला व पुरुषांसाठी शाकाहारी व मांसाहारी भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. भोजनानंतर विवाहसंस्थेचे महत्त्व, समाजातील ऐक्य व समन्वय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेला वधू-वर सूचक मेळावा सुरू झाला. सहभागी वधू-वरांना परस्पर परिचय व संवाद साधण्यासाठी स्वतंत्र व सुयोग्य व्यवस्था करण्यात आली होती. उत्कृष्ट नियोजनामुळे उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. अनेक कुटुंबांनी अशा उपक्रमांची समाजाला गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सोलापूर-धाराशिव-लातूर जिल्हा गौड (कलाल) समाज सेवा संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. समाजातील युवक-युवतींना एकत्र आणून योग्य जीवनसाथी निवडण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री तिरुपती बुरुगवार (कार्यक्रम अध्यक्ष), श्रीनिवास गुल्लापल्ली, राजू गुल्लापल्ली, कैलास तालापेल्लीवर, श्रीनिवास बुर्रा, मनोहर बुर्रा, सुरज बुरुगवार, प्रवीण बुरुगवार, सुमित गुल्लापल्ली, रमेश बोडगे, लक्ष्मण गोडसेलवार, धर्मा पुरुषोत्तम यांनी पुढाकार घेत अथक परिश्रम घेतले.
यावेळी सोलापूर भागातील भंडारी समाजाच्या न्याती संस्थेचे संचालक तसेच भंडारी समाज सेवा संघाचे शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी अशाच प्रकारचा भव्य मेळावा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर शहरात देखील आयोजित करण्यात यावा, अशी अपेक्षा उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली.



