सोलापूर

विद्यार्थ्यांना दिलासा: शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क जिल्हा परिषद भरणार

सोलापूर (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे.या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेचे शुल्क जिल्हा परिषद सेस निधीतून भरणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

सध्या जिल्ह्यातील ११ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र अनेक विद्यार्थी अद्याप नोंदणीपासून वंचित असल्याने नोंदणीची प्रक्रिया गतीमान करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून, त्यानंतर उशिराने केलेल्या अर्जाचे शुल्क जिल्हा परिषद भरणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेत पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) विद्यार्थी सहभागी होणार आहेत. परीक्षा २२ फेब्रुवारी रोजी राज्यभर एकाच दिवशी होणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आणि शैक्षणिक स्पर्धेत पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत भरलेल्या अर्जांमध्ये,
पाचवी शिष्यवृत्ती विद्यार्थी – ८,३२३
आठवी शिष्यवृत्ती विद्यार्थी – ३,२८१

अशी नोंद आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शाळांतील मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडावी, असा आदेशही दिला आहे. मुदत संपल्यावर करण्यात आलेल्या उशिराच्या नोंदणी शुल्काची जबाबदारी संबंधित शाळांची राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले, “जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क हे जिल्हा परिषद सेस निधीतून भरण्यात येणार आहे. ग्रामीण व शासकीय शाळांतील विद्यार्थी शैक्षणिक स्पर्धेत मागे राहू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.”

 

💬

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!