सोलापूर

बार्शी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा सीईओ कुशल जैन यांनी घेतला आढावा

पाणीटंचाई, चारा उपलब्धता, पीक नुकसानीसह विकासकामांची केली पाहणी; तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश

बार्शी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा सीईओ कुशल जैन यांनी घेतला आढावा

पाणीटंचाई, चारा उपलब्धता, पीक नुकसानीसह विकासकामांची केली पाहणी; तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश

बार्शी : तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पाणी व चारा टंचाई, पीक नुकसान तसेच विविध विकासकामांच्या प्रगतीचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सविस्तर आढावा घेतला. पंचायत समिती येथे आढावा बैठक घेऊन त्यांनी तालुक्यातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच प्रत्यक्ष गावांना भेटी देत नागरिक, शेतकरी, महिला बचतगट, विद्यार्थी आणि आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाची पाहणी केली.

बार्शी पंचायत समिती येथे झालेल्या आढावा बैठकीत पाणीटंचाईची सद्यस्थिती, चारा उपलब्धता, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली तसेच पूर्ण झालेली कामे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना कुशल जैन यांनी विभागप्रमुख, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ग्रामसेवकांकडून गावनिहाय टंचाई परिस्थितीची माहिती घेतानाच घरकुल योजना आणि समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रगतीचाही सखोल आढावा घेण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. अभियानातील कामे केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून ती प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

• शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी •

यानंतर कुशल जैन यांनी उपळाई ठोंगे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांची स्थिती जाणून घेत संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. पीक नुकसानीचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करून पुढील तीन दिवसांत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.

उपळाई ठोंगे येथील जिल्हा परिषद शाळेलाही त्यांनी भेट दिली. यावेळी शाळेतील जिल्ह्यातील उत्कृष्ट परसबागेची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पोषणासोबतच शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

महिला बचतगटाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून बचतगटांना मंजूर झालेली कर्जे, सुरू असलेले उद्योग आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून उद्योगांना अधिक चालना देण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तालुक्यात नुकत्याच सुरू झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यालाही कुशल जैन यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. पशुधनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पशुपालकांना वेळेवर आवश्यक पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

पानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन इमारत, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगली आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, यासाठी ओपीडीची संख्या वाढविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.

या दौऱ्यात प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, सभापती मीनाक्षी रोंगे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांच्यासह तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!