बॅनरवर सोन्याच्या भल्या मोठ्या चेन मिरवणाऱ्यांची आता पोलिसांकडून चौकशी!
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचा शांतता समितीच्या बैठकीत इशारा; विनापरवाना डिजिटल बॅनरही हटविणार
बॅनरवर सोन्याच्या भल्या मोठ्या चेन मिरवणाऱ्यांची आता पोलिसांकडून चौकशी!
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचा शांतता समितीच्या बैठकीत इशारा; विनापरवाना डिजिटल बॅनरही हटविणार
सोलापूर : शहरातील चौकाचौकात उत्सव, वाढदिवस आणि विविध कार्यक्रमांच्या शुभेच्छांसाठी उभारण्यात येणाऱ्या डिजिटल बॅनरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या बॅनरबाजीसोबतच त्यावर झळकणाऱ्या छायाचित्रांमध्ये गळ्यातील भल्या मोठ्या सोन्याच्या चेन मिरविण्याचीही एक वेगळीच ‘क्रेझ’ दिसून येत आहे. आता अशा प्रकारे मोठ्या सोन्याच्या चेन घालून छायाचित्रे बॅनरवर झळकविणाऱ्यांना बोलावून, एवढे दागिने आले कोठून, याची चौकशी केली जाईल, असा थेट इशारा पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिला.

शांतता समितीच्या बैठकीत बोलताना आयुक्तांनी शहरातील वाढत्या डिजिटल बॅनरच्या समस्येकडेही लक्ष वेधले. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील अनेक चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटल बॅनर लावण्यात आले होते. काही ठिकाणी या फलकांमुळे मिरवणुकीला तसेच मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना अडथळा निर्माण झाला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावताना नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात एखाद्या व्यक्तीने किंवा मंडळाने डिजिटल बॅनर लावल्यानंतर त्याच पद्धतीने दुसऱ्यानेही बॅनर लावण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. ही प्रवृत्ती आता वाढत असून, १५-१६ वर्षांची मुलेही बॅनर लावण्याचा विचार करू लागली आहेत, असे आयुक्तांनी बैठकीत नमूद केले.
उत्सवाच्या निमित्ताने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मोठमोठे फलक लावण्यापेक्षा सामाजिक आणि सार्वजनिक कामातून आपली ओळख निर्माण करणे महत्त्वाचे आहे. एखाद्या मंडळाने चांगले काम केले असेल, तर त्या परिसरातील नागरिकांना त्याची माहिती असते. त्यामुळे त्यासाठी मोठमोठे फलक लावण्याची आवश्यकता नाही, असे आयुक्तांनी सांगितले.
उत्सवाच्या काळात ‘आपले स्वागत आहे’, ‘उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा’ अशा आशयाचे बॅनर मोठ्या प्रमाणावर लावले जातात. मात्र, उत्सवासाठी दर्शनाला किंवा मिरवणूक पाहण्यासाठी आलेले नागरिक या बॅनरकडे फारसे लक्षही देत नाहीत.
त्यामुळे केवळ शुभेच्छा देण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे फलक उभारण्याची गरज नाही. शुभेच्छाच द्यायच्या असतील तर त्या समक्ष द्या, असेही पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी स्पष्ट केले.
शहरातील विनापरवाना डिजिटल बॅनर आणि फलकांवरही कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या मदतीने नियमबाह्य आणि विनापरवाना फलक काढून घेण्यात येतील. सार्वजनिक रस्ते, चौक तसेच मिरवणुकीच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे संकेतही त्यांनी दिले.
दरम्यान, डिजिटल बॅनरवरील छायाचित्रांमध्ये गळ्यातील मोठमोठ्या सोन्याच्या चेन ठळकपणे दाखविणाऱ्यांकडे पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. अशा व्यक्तींना बोलावून त्यांच्या दागिन्यांबाबत चौकशी केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
उत्सव साजरे करताना नागरिकांना अडथळा होणार नाही, सार्वजनिक व्यवस्था बिघडणार नाही आणि अनावश्यक बॅनरबाजीला प्रोत्साहन मिळणार नाही, यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचा संदेश या बैठकीतून पोलिस प्रशासनाने दिला आहे.



