सोलापूर

अनुदानित वसतिगृहांच्या सुधारणेसह २० टक्के सेस फंडाच्या नियोजनावर भर

नूतन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सागर सोनवणे यांची माहिती

अनुदानित वसतिगृहांच्या सुधारणेसह २० टक्के सेस फंडाच्या नियोजनावर भर

नूतन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सागर सोनवणे यांची माहिती

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारीपदी सागर सोनवणे यांनी १ ऑगस्टपासून पदभार स्वीकारला आहे. जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच अनुदानित वसतिगृहांच्या सुधारणेसाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सागर सोनवणे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून सेवेत आलेले अधिकारी असून, सोलापूर जिल्हा परिषदेत पदभार स्वीकारण्यापूर्वी ते पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पुणे येथील कामाचा अनुभव घेतल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.

सोलापूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागामध्ये अनुदानित वसतिगृह खूप आहेत. या वसतिगृहांची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा तसेच आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात येणार आहे. वसतिगृहांमध्ये कोणत्या प्रकारे सुधारणा करता येतील, याचे नियोजन करून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.

वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे, आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर व्हावा, यासाठी संबंधित घटकांशी समन्वय साधून काम करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांना मिळणाऱ्या योजनांसाठी २० टक्के सेस फंडाचा वापर केला जातो. या निधीचा योग्य पद्धतीने वापर करून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे.

“२० टक्के सेस फंड जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत वापरला जातो. तो वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी असून, त्याचेही नियोजन मी करणार आहे,” असे नूतन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सागर सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, निधीचा योग्य विनियोग करणे आणि योजनांच्या अंमलबजावणीला अधिक गतिमान करण्यासाठी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून काम करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत असताना अनुदानित वसतिगृहे आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी उपलब्ध असलेला निधी या दोन्ही बाबींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!