सोलापूर

माहिती अधिकार अर्जांवर कार्यवाही करताना कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करा : सिईओ कुशल जैन

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत माहिती अधिकार दिन; यशदाचे मुख्य प्रशिक्षक शिवाजी पवार यांचे मार्गदर्शन

माहिती अधिकार अर्जांवर कार्यवाही करताना कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करा : सिईओ कुशल जैन

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत माहिती अधिकार दिन; यशदाचे मुख्य प्रशिक्षक शिवाजी पवार यांचे मार्गदर्शन

सोलापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषद सोलापूरच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ‘माहितीचा अधिकार दिन’ आयोजित करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, अर्जांवरील कार्यवाही आणि नागरिकांना माहिती उपलब्ध करून देताना घ्यावयाची कायदेशीर दक्षता याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ समिती सभापती इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी यशदाचे मुख्य प्रशिक्षक शिवाजी पवार यांनी माहितीचा अधिकार अधिनियमातील विविध तरतुदींची सविस्तर माहिती दिली. माहिती अधिकाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाने कोणती कार्यवाही करावी, अर्जातील मागणीचे स्वरूप कसे तपासावे, उपलब्ध अभिलेखांमधून माहिती कशी संकलित करावी तसेच माहिती देताना कोणत्या बाबींची दक्षता घ्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

माहिती अधिकार कायद्याचा योग्य अभ्यास आणि त्यातील तरतुदींची स्पष्ट समज प्रत्येक संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याला असणे आवश्यक आहे. नागरिकांनी मागितलेली उपलब्ध व देय माहिती कायद्यातील तरतुदींनुसार स्पष्ट, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे शिवाजी पवार यांनी सांगितले.

माहिती अधिकार अर्जांची प्रत्यक्ष हाताळणी करताना येणाऱ्या विविध परिस्थितींची उदाहरणे देत त्यांनी अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया, माहिती उपलब्ध नसल्यास करावयाची कार्यवाही, कायद्यातील अपवादात्मक तरतुदी, प्रथम अपील आणि त्यानंतरची प्रक्रिया याबाबतही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन केले.

• पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार प्रभावी ठरावा : दीपक वैद्य •

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी माहितीचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचा कायदा असल्याचे नमूद केले. प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी माहिती अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. नागरिकांना त्यांच्या हक्काची माहिती वेळेत आणि नियमांच्या चौकटीत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले.

• नियमांच्या चौकटीत नागरिकांना माहिती द्या : कुशल जैन •

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी माहिती अधिकाराच्या अर्जांकडे सकारात्मक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदी समजून घेऊन प्रत्येक अर्जावर नियमानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. नागरिकांना आवश्यक माहिती सुलभ, स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने उपलब्ध करून देताना कायदेशीर बाबींचीही दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने आपल्या विभागाशी संबंधित माहिती अधिकाराच्या तरतुदी, अभिलेख व्यवस्थापन आणि अर्जांच्या हाताळणीची प्रक्रिया यांचा नियमित अभ्यास करावा. त्यामुळे माहिती अधिकार अर्जांवरील कार्यवाही अधिक परिणामकारक आणि नियमबद्ध पद्धतीने करता येईल, असेही कुशल जैन यांनी नमूद केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामान्य प्रशासन विभागाने विशेष प्रयत्न केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!