सोलापूर

सेवा संकल्पातून १९ बालहृदयांना नवी आशा; मोफत शस्त्रक्रियेसाठी बालकांची मुंबईकडे रवाना

प्रवास, निवास, भोजनासह उपचाराचा खर्चही मोफत; सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत २,००३ बालहृदय शस्त्रक्रिया

सेवा संकल्पातून १९ बालहृदयांना नवी आशा; मोफत शस्त्रक्रियेसाठी बालकांची मुंबईकडे रवाना

प्रवास, निवास, भोजनासह उपचाराचा खर्चही मोफत; सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत २,००३ बालहृदय शस्त्रक्रिया

सोलापूर : गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बालकांना गंभीर आजारांवर वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाला सोलापूर जिल्ह्यातून महत्त्वपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्र (DEIC), जिल्हा रुग्णालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या १९ बालकांना मोफत उपचारासाठी विशेष बसद्वारे मुंबईकडे रवाना करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन यांच्या हस्ते विशेष बसला हिरवा झेंडा दाखवून बालकांना मुंबईकडे रवाना करण्यात आले. मुंबई येथील बालाजी रुग्णालयात या बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान हृदयरोगाचे निदान झालेल्या आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली.

शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना शिबिराच्या सुमारे पंधरा दिवस आधी पूर्वसूचना देण्यात आली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली तसेच मुंबई येथे होणाऱ्या मोफत हृदय शस्त्रक्रियेबाबत पालकांचे समुपदेशन करण्यात आले.

प्रत्येक बालकासोबत दोन पालकांना मुंबईला पाठविण्यात आले आहे. बालकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष बससोबत वैद्यकीय पथकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई येथील उपचारादरम्यान बालक आणि त्यांच्या पालकांसाठी ये-जा प्रवास, निवास, नाश्ता, भोजन तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महागड्या हृदय शस्त्रक्रियेचा खर्च परवडणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अनेकदा शक्य होत नाही. अशा परिस्थितीत शासनाच्या आरोग्य यंत्रणेमार्फत शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून दिल्याने संबंधित कुटुंबांना मोठा आधार मिळत आहे.

• आतापर्यंत २ हजारांहून अधिक बालहृदय शस्त्रक्रिया •

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात बालकांच्या आरोग्य तपासणीपासून उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रियेपर्यंत विविध सेवा सातत्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ३ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया, तर विविध आजारांसाठी ११ हजार ८६० शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रियांचा लाभ मोठ्या प्रमाणावर गरीब आणि कष्टकरी कुटुंबातील बालकांना मिळाला आहे.

साधारणपणे १० हजार रुपयांपासून ८ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असलेल्या विविध शस्त्रक्रिया पात्र बाल लाभार्थ्यांसाठी मोफत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गंभीर आजार असलेल्या बालकांना आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहण्याची वेळ टळत आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केवळ शस्त्रक्रियाच नव्हे, तर बालकांच्या विविध आजारांचे लवकर निदान करून त्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. किरकोळ आजार असलेल्या असंख्य बालकांना तपासणीच्या ठिकाणीच औषधोपचार देण्यात आले आहेत.

वेळेवर निदान आणि उपचारामुळे आजार बळावण्यापूर्वी त्यावर उपचार करणे शक्य होत असून, भविष्यातील आरोग्यविषयक गुंतागुंत आणि संभाव्य धोके टाळण्यास मदत होत आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.

बालकांना मुंबईकडे रवाना करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. इरफान सय्यद, मेट्रन श्रीमती विजयमाला बेले यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि DEICमधील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बालकांच्या आरोग्याचे लवकर निदान, वेळेवर उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया उपलब्ध करून देत त्यांना निरोगी जीवनाची संधी देण्याचे काम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू आहे.

सेवा संकल्प अभियानांतर्गत मुंबईकडे रवाना झालेल्या १९ बालकांच्या हृदय शस्त्रक्रियांमुळे त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, या उपक्रमातून बालकांच्या निरोगी भविष्यासाठी आरोग्य विभागाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!