सेवानिवृत्तीच्या निधीसाठी मागितली रुपये १० हजारांची लाच; सोलापूर महापालिकेचा कर्मचारी रंगेहात अटक

सेवानिवृत्तीच्या निधीसाठी मागितली
रुपये १० हजारांची लाच; सोलापूर महापालिकेचा कर्मचारी रंगेहात अटक
सोलापूर : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे फंड आणि इतर शासकीय लाभ मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. आधी ६ हजार रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी एसीबीच्या सापळ्यात अडकला.
या प्रकरणातील आरोपी पंकज जगन्नाथ महाले (वय ३२) हा सार्वजनिक आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका येथे कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सुरू आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांनी सार्वजनिक आरोग्य विभागात बिगारी म्हणून सेवा बजावली होती. ते ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर पेन्शन, फंड आणि इतर शासकीय देयके मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदारांनी ९ जून २०२६ रोजी अर्ज केला होता. अर्जाच्या पाठपुराव्यादरम्यान आरोपी लिपिकाने काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदारांकडून आरोपीने यापूर्वी ६ हजार रुपये स्वीकारले होते. मात्र उर्वरित ४ हजार रुपये देण्याची मागणी कायम ठेवण्यात आल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर ३० जून २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान आरोपी पंकज महाले याने तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपासाचे काम पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण करीत आहेत.
दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणीही कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक, सोलापूर.
संकेतस्थळ- www.acbmaharashtra.gov.in ईमेल www.acbwebmail@mahapolice.gov.inऑनलाईन तक्रार अॅप-acbmaharashtra.netटोल फ्री क्रमांक १०६४दुरध्वनी क्रमांक- ०२१७-२३१२६६८ व्हॉटसअॅप क्रमांक-९४०४००१०६४



