वीज गेली… पण उपचार थांबले नाहीत! मोबाईलच्या प्रकाशात अपघातग्रस्त वारकरी भाविकावर यशस्वी उपचार
धर्मपुरी येथील आषाढी वारी उपचार केंद्रातील प्रेरणादायी घटना; डॉ. सोनाली परतवार व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे भाविकांच्या पालकांकडून कौतुक

वीज गेली… पण उपचार थांबले नाहीत! मोबाईलच्या प्रकाशात अपघातग्रस्त वारकरी भाविकावर यशस्वी उपचार
धर्मपुरी येथील आषाढी वारी उपचार केंद्रातील प्रेरणादायी घटना; डॉ. सोनाली परतवार व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे भाविकांच्या पालकांकडून कौतुक
पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना त्यांच्या आरोग्य सेवेसाठी विविध ठिकाणी उपचार केंद्रे कार्यरत आहेत. अशाच प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोची अंतर्गत धर्मपुरी येथील स्वागत कक्ष व औषधोपचार केंद्रात शनिवारी सायंकाळी मानवतेचे दर्शन घडवणारी घटना घडली.

सायंकाळच्या सुमारास एका अपघातग्रस्त वारकरी भाविकाला गंभीर जखमी अवस्थेत उपचार केंद्रात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली परतवार यांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, त्याचवेळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही उपचार थांबविण्याऐवजी आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश वापरून जखमी भाविकाच्या जखमेवर टाके घालण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

डॉ. सोनाली परतवार यांच्यासह आरोग्य सेविका मनिषा जाधव यांनी अत्यंत शांतपणे आणि तत्परतेने उपचार करून जखमी भाविकाला आवश्यक वैद्यकीय मदत दिली. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे अपघातग्रस्त भाविकाची प्रकृती स्थिर राहण्यास मदत झाली.
या प्रसंगानंतर अपघातग्रस्त भाविकाच्या पालकांनी वैद्यकीय अधिकारी आणि संपूर्ण आरोग्य पथकाचे मनापासून आभार मानले. “वीज नसतानाही उपचार न थांबवता आमच्या मुलावर वेळेत उपचार केल्यामुळे मोठा दिलासा मिळाला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आषाढी वारीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्याला प्राधान्य देत सेवा बजावणाऱ्या धर्मपुरी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या तत्परतेने आरोग्य सेवेतील संवेदनशीलता आणि सेवाभावाचे जिवंत उदाहरण समोर आले आहे.



