सोलापूर

श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत नवरात्रोत्सवानिमित्त महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत नवरात्रोत्सवानिमित्त महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

सोलापूर : इंदिरा ज्ञानवर्धिनी, सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिला पालकांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने पाककला, रांगोळी व मेहंदी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना महिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या २५० हून अधिक माता-पालकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ. शिल्पाताई ठोकळ होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ. वीणा पवार, इनरव्हील क्लब सोलापूरच्या अध्यक्षा सौ. दीप्ती देसाई आणि सचिवा सौ. जेमिनी बक्षी उपस्थित होत्या. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व स्व. निर्मलाताई ठोकळ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

पाककला स्पर्धेत महिला पालकांनी एकापेक्षा एक सरस असे उपवासाचे खाद्यपदार्थ तयार करून आणले होते. परीक्षकांसह कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिल्पाताई ठोकळ यांनी विविध खाद्यपदार्थांचे निरीक्षण करून त्यांचा आस्वाद घेतला. या वेळी प्रशालेतील विद्यार्थिनींनी टिपरीवरील समूह नृत्याचे आकर्षक सादरीकरण केले.

पाककला स्पर्धेत सौ. कांचन धाये यांनी प्रथम, तर सौ. महादेवी सिद्धेश्वर वाघमारे यांनी द्वितीय क्रमांक तर सौ सुजाता विजय राठोड यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

रांगोळी स्पर्धेत सौ. जयश्री महादेव धुळराव यांनी प्रथम, सौ. सोनाली चेतन गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक तर कु कशिश धर्मराज शिरस्वार हिने तृतीय क्रमांक मिळविला.

मेहंदी स्पर्धेत कु. अजवा अमीन पटेल यांनी प्रथम, सौ. सुरैय्या इस्माईल शेख यांनी द्वितीय, तर कु. सादिया आरिफ शेख यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुण्या सौ. वीणा पवार यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक केले. महिला पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. शिल्पाताई ठोकळ यांनी कार्यक्रमातील विविध उपक्रम आणि विद्यार्थिनींचे नृत्यसादरीकरण पाहून आपण मंत्रमुग्ध झाल्याची भावना व्यक्त केली.

इनरव्हील क्लब सोलापूरच्या अध्यक्षा सौ. दीप्ती देसाई आणि सचिवा सौ. जेमिनी बक्षी यांनी नवरात्रोत्सवानिमित्त महिला पालकांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि नारीशक्तीचा सन्मान करणारा हा उपक्रम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य प्रदर्शित करणाऱ्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री. डी. डी. गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रुती मोहोळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. वैशाली पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व महिला शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!