घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; जिल्ह्यात फिरते पथक स्थापन करण्याचे आदेश

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; जिल्ह्यात फिरते पथक स्थापन करण्याचे आदेश
सोलापूर (प्रतिनिधी):- घरगुती एलपीजी गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना याबाबत सूचना दिल्या असून तालुकास्तरावर दक्षता व फिरते पथक स्थापन करून तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंत्रालयातून प्राप्त झालेल्या शासनपत्राच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. सध्या जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधनाच्या तुटवड्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शासनाने नमूद केले आहे. अशा परिस्थितीत गॅसचे दर वाढण्याची आणि घरगुती गॅसचा अवैध वापर अथवा काळाबाजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कता वाढविली आहे.
शासन निर्णयानुसार घरगुती एलपीजी गॅसचा व्यावसायिक वापर किंवा काळाबाजार रोखण्यासाठी गॅस एजन्सींची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माळशिरस, सांगोला, बार्शी, माढा आणि करमाळा या तालुक्यांतील तहसीलदारांना दक्षता पथक स्थापन करून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पथकांकडून गॅस एजन्सी, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना आणि अन्य ठिकाणी घरगुती गॅसचा गैरवापर होत आहे का याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गॅसचे वितरण सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तात्काळ जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.



