राजकारण

अर्जांची जत्रा… पण उमेदवार कुठे? सोलापूर महापालिका निवडणुकीत ८५४ अर्जांची विक्री, प्रत्यक्ष दाखल फक्त ६!

अर्जांची जत्रा… पण उमेदवार कुठे? सोलापूर महापालिका निवडणुकीत ८५४ अर्जांची विक्री, प्रत्यक्ष दाखल फक्त ६!

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या विक्रीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून निवडणूक प्रक्रियेला अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात अर्ज विक्री होत असतानाही प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत उमेदवारांमध्ये अद्याप सावध भूमिका दिसून येत आहे.

शुक्रवार, दि. २६ डिसेंबर रोजी एकूण ८५४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे. मात्र, दिवसअखेर फक्त सहा उमेदवारांनी प्रत्यक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय अर्ज विक्रीचा तपशील पाहता ,
🔹 अधिकारी-१ कडे १५२
🔹 अधिकारी-२ कडे ९१
🔹 अधिकारी-३ कडे १२२
🔹 अधिकारी-४ कडे १२४
🔹 अधिकारी-५ कडे १४८
🔹 अधिकारी-६ कडे ५५
🔹 अधिकारी-७ कडे सर्वाधिक १६२ अर्जांची विक्री झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांमध्ये प्रभाग १२-ब (पुरुष), प्रभाग १०-अ (महिला), प्रभाग १०-ब (महिला), प्रभाग १०-क (पुरुष), प्रभाग १० (पुरुष) आणि प्रभाग ११ (पुरुष) या प्रभागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एका उमेदवाराने दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केल्याची माहितीही निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

अर्जविक्रीचा वेग आणि इच्छुकांची वाढती गर्दी पाहता, येत्या काही दिवसांत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्या तरी “अर्ज भरपूर… उमेदवार मात्र मोजके” अशीच स्थिती सोलापूर महापालिका निवडणुकीत पाहायला मिळत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!