महाराष्ट्र

मंत्रालयातील बैठकीत मोठा निर्णय? एसटीच्या उत्पन्नाला वेग देण्यासाठी नवे सूत्र तयार

मंत्रालयातील बैठकीत मोठा निर्णय? एसटीच्या उत्पन्नाला वेग देण्यासाठी नवे सूत्र तयार

मुंबई (प्रतिनिधी):- परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत एसटीच्या सध्याच्या कामकाजाचा, प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा आणि सेवेत आवश्यक सुधारणांचा सखोल आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत आहे. मात्र, सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकवणे अशक्य असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

“प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे होय. एसटी बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील,” असा कडक संदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत मार्ग नियोजन, बस फेऱ्यांची नियमितता, प्रवासी सुविधा, तांत्रिक देखभाल आणि आर्थिक शिस्त यावर विशेष चर्चा करण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, एसटी सेवा अधिक वक्तशीर आणि प्रवासी-केंद्रित करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होऊन महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!