इक्बाल मैदानात टाकला सापळा…. आणि उघडकीस आली मोबाईल चोरीची मोठी साखळी!

इक्बाल मैदानात टाकला सापळा…. आणि उघडकीस आली मोबाईल चोरीची मोठी साखळी!
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई करत तडीपार आरोपींकडून चोरी केलेले तब्बल १११ मोबाईल फोन जप्त केले आहेत. या जप्त मोबाईलची एकूण किंमत १३ लाख ५२ हजार ९९८ रुपये इतकी असून या कारवाईमुळे मोबाईल चोरीच्या चार गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे.
जानेवारी २०२६ दरम्यान जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीचे चार स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपआयुक्त विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून सुरू होता.
दरम्यान, १७ जानेवारी २०२६ रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इक्बाल मैदान परिसरात सापळा रचण्यात आला. या सापळ्यातून फारुक महमद हनिफ पठाण (वय ४२, रा. शहापूर चाळ, सोलापूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तडीपार आरोपी गणेश उर्फ आप्पा बैरुणगी व लखन बैरुणगी यांनी शहरातील विविध भागांतून मोबाईल चोरी करून ते विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली.
पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून चोरीचे एकूण १११ मोबाईल हस्तगत केले असून, त्यामुळे जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेले चारही मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नेतृत्व आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली असून पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.


