महाराष्ट्र

“भीमा कोरेगावचा इतिहास म्हणजे मानवतेचा इतिहास” – ५०० शूरवीरांना अभिवादन करताना ॲड.प्रकाश आंबेडकरांचे प्रतिपादन

“भीमा कोरेगावचा इतिहास म्हणजे मानवतेचा इतिहास” – ५०० शूरवीरांना अभिवादन करताना ॲड. प्रकाश आंबेडकरांचे प्रतिपादन

पुणे (प्रतिनिधी):- शौर्य दिनाच्या निमित्ताने आज १ जानेवारी २०२६ रोजी ऐतिहासिक भीमा कोरेगाव येथे लाखो भीम अनुयायांचा जनसागर उसळला. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी विजयस्तंभाला मानवंदना देत शौर्य, स्वाभिमान आणि सामाजिक समतेचा जागर केला. संपूर्ण परिसर “जय भीम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभास भेट देत ५०० शूरवीरांना अभिवादन केले.

विजयस्तंभाजवळ उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले,
“भीमा कोरेगावचा इतिहास हा केवळ एका लढाईचा नाही, तर तो देशातील मानवतेचा इतिहास आहे. हा लढा तत्कालीन जातीय अन्यायाविरुद्धचा निर्णायक संघर्ष होता. हा विजय म्हणजे आत्मसन्मान, समता आणि न्यायाचा विजय आहे.” ते पुढे म्हणाले की, “हा लढा जिंकला गेला आणि तिथूनच एका ‘नव्या भारताच्या’ पर्वाची खरी सुरुवात झाली. हा केवळ लष्करी विजय नव्हे, तर विचारांचा विजय आहे.”

ॲड. आंबेडकर यांनी सांगितले की, या विजयानंतर ब्रिटिश सत्ता भारतात प्रस्थापित झाली असली तरी त्याचबरोबर आधुनिक भारताच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या नव्या विचारसरणीचा पाया घातला गेला. भीमा कोरेगावचा विजय हा दलित, वंचित आणि बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाचा ऐतिहासिक टप्पा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या शौर्य दिनाच्या सोहळ्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच लाखो भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विजयस्तंभाला अभिवादन केले.

भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती.
मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त,ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे निगराणी ,पिण्याचे पाणी, रुग्णवाहिका व आरोग्य सेवा,फिरती शौचालये तसेच वाहतुकीचे विशेष नियोजन यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत पार पडला.

भीमा कोरेगाव शौर्य दिनाने पुन्हा एकदा देशाला स्वाभिमान, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला असून हा इतिहास नव्या पिढीला दिशा देणारा आहे, अशी भावना उपस्थित अनुयायांमध्ये दिसून आली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!