लर्निंग लायसन्स घोटाळा उघड; बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अटकेत

लर्निंग लायसन्स घोटाळा उघड; बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अटकेत
जालना (प्रतिनिधी):- शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात जालना पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करत फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी बिड्डराज प्रमोद यादव (वय २४, रा. टेंगराहा, जि. सहरसा, बिहार) याला बिहार येथून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि सायबर पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली आहे. या प्रकरणी दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, डिजिटल ट्रॅकिंग आणि सायबर तपासाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावला.
तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शिकाऊ वाहन चालक परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट वेबसाईट तयार केली होती. या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांकडून वैयक्तिक माहिती व शुल्क गोळा करून शासकीय संगणक प्रणालीत बेकायदेशीर प्रवेश केला जात होता. यामुळे अनेक नागरिकांची आर्थिक व वैयक्तिक माहिती धोक्यात आली होती.
या गुन्ह्यात यापूर्वीच जम्मू-काश्मीर येथील फैसल बशीर मीर आणि जालना येथील मुजाहिद उर्फ डॉन रईसोद्दीन अन्सारी यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसारच मुख्य सूत्रधार बिड्डराज यादवपर्यंत पोलिसांची मजल गेली.
सध्या आरोपीकडून अधिक चौकशी सुरू असून, या टोळीने राज्यासह देशातील इतर भागांमध्येही अशीच फसवणूक केली आहे का, याचा तपास केला जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी आरोपी अडकण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स किंवा अन्य शासकीय सेवा फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळांवरूनच घ्याव्यात आणि कोणत्याही बनावट वेबसाईट किंवा दलालांच्या आमिषाला बळी पडू नये.


