कॉलेजकडे निघालेलं स्वप्न अर्ध्यातच संपलं! मोहोळजवळ भरधाव टेम्पोचा कहर; १७ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

कॉलेजकडे निघालेलं स्वप्न अर्ध्यातच संपलं! मोहोळजवळ भरधाव टेम्पोचा कहर; १७ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

मोहोळ (प्रतिनिधी):- कॉलेजचे स्वप्न, विज्ञान शाखेतील शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याची आशा उराशी बाळगून घराबाहेर पडलेल्या दोन विद्यार्थिनींवर काळाने अचानक झडप घातली. मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
तांबोळे (ता. मोहोळ) येथील प्रज्ञा धनाजी कोकाटे (वय १७) ही मोहोळ येथील नेताजी महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. आज सकाळी प्रज्ञा आणि तिची मैत्रीण स्नेहल काशिनाथ वाघमोडे (वय १७, रा. नजीक पिंपरी) या दोघी दुचाकीवरून नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाल्या होत्या. मात्र नजीक पिंपरीच्या हद्दीत समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेचा जोर इतका भीषण होता की प्रज्ञा कोकाटे हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या स्नेहल वाघमोडे हिला तत्काळ मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्नेहल ही कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय, मोहोळ येथे ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे.
घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला टेम्पो व त्याचा चालक ताब्यात घेतला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण आणि वेगाचा अंदाज घेण्यासाठी पुढील तपास केला जात आहे.
एका उमद्या, होतकरू विद्यार्थिनीचा असा अचानक आणि दुर्दैवी अंत झाल्याने तांबोळे, नजीक पिंपरी व मोहोळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भरधाव वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


