राज्यातील २९ महानगरपालिकांतील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत; २२ जानेवारीला मंत्रालयात बैठक

राज्यातील २९ महानगरपालिकांतील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत; २२ जानेवारीला मंत्रालयात बैठक
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या प्रक्रियेसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अधिकृत प्रेस नोट जारी केली आहे.

या प्रेस नोटनुसार, महापौर पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठीची सोडत मा. राज्य मंत्री (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. ही सोडत दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, मंत्रालयातील परिषद सभागृह (६ वा मजला) येथे आयोजित करण्यात आली आहे.
राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच खुल्या प्रवर्गातील आरक्षण निश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया पार पडणार आहे. या सोडतीच्या माध्यमातून आगामी कालावधीसाठी महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे, हे स्पष्ट होणार आहे.
सदर सोडतीदरम्यान राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतील निर्णयानुसार पुढील महापालिका कारभार आणि राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याने या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगर विकास विभागाने सदर बैठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.



