सोलापूर

हसतमुख अभियंत्याची मुंबईकडे झेप! संतोष कुलकर्णी यांची अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती

सोलापूर जिल्हा परिषदेतील विकासकामांची यशस्वी धुरा सांभाळत कर्मचाऱ्यांची मने जिंकणारे संतोष कुलकर्णी आता एमएसआरडीसीच्या मुंबई विभागात सांभाळणार महत्त्वाची जबाबदारी

हसतमुख अभियंत्याची मुंबईकडे झेप! संतोष कुलकर्णी यांची अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती

सोलापूर जिल्हा परिषदेतील विकासकामांची यशस्वी धुरा सांभाळत कर्मचाऱ्यांची मने जिंकणारे संतोष कुलकर्णी आता एमएसआरडीसीच्या मुंबई विभागात सांभाळणार महत्त्वाची जबाबदारी

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), मुंबई विभाग येथे अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) पदावर पदोन्नतीसह नियुक्ती केली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेसह बांधकाम विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

*काम म्हणजे जबाबदारी… आणि जबाबदारी म्हणजे संतोष कुलकर्णी*

संतोष कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असताना केवळ प्रशासकीय कामेच केली नाहीत, तर विकासकामांना वेग देण्याचे मोठे काम केले. कोणतेही काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी त्यांची नेहमीच धडपड असायची. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदारांमध्येही त्यांच्या कार्यशैलीबद्दल आदराची भावना निर्माण झाली होती.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद मुख्यालयातील अंतर्गत बांधकामे, देखभाल, दुरुस्ती आणि प्रशासकीय इमारतींचे व्यवस्थापन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. अतिरिक्त कार्यभार असूनही त्यांनी सर्व कामे नियोजनबद्ध आणि कार्यक्षमतेने पूर्ण केली.

बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते, पूल, शासकीय इमारती, दळणवळण सुविधा तसेच विविध विकासकामांच्या निविदा, तांत्रिक मंजुरी आणि अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण ठेवले. अनेक रखडलेली कामे मार्गी लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.

पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी रस्ते दुरुस्ती, तात्पुरत्या सुविधा, यात्रेचे नियोजन आणि विकासकामांमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे व सुर्यकांत भुजबळ यांच्यासमवेत समन्वय साधत तांत्रिक अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले.

‘माझी वसुंधरा अभियान’, ग्रामीण आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका सेवा, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व्हॅन यांसारख्या विविध शासकीय योजनांमध्ये आवश्यक तांत्रिक मंजुरी, नियोजन आणि पायाभूत सुविधा उभारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

*अधिकारी नव्हे… कुटुंबप्रमुख*

संतोष कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कामाइतकेच मनमिळावू होते. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत ते कर्मचाऱ्यांसोबतच बसून डबा जेवत असत. प्रत्येक कर्मचाऱ्याची विचारपूस करणे, अडचणी समजून घेणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हा त्यांच्या दैनंदिन कामाचा भाग होता.

यामुळे कर्मचारी त्यांना अधिकारी म्हणून नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणून मान देत असत.

क्रिकेटची विशेष आवड असलेले संतोष कुलकर्णी कार्यालयीन स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होत. गायनाची आवड असल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत ते रंग भरत असत. गणेशोत्सव असो किंवा इतर सामाजिक कार्यक्रम, ते नेहमीच सहभाग घेऊन सहकाऱ्यांचा उत्साह वाढवत असत. अनेकदा नृत्य सादर करूनही त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली.

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचे ते मोठे चाहते आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास, प्रभावी संवादशैली आणि नेतृत्वगुणांमुळे जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी त्यांना प्रेमाने ‘डॉन’ या टोपणनावाने संबोधत असत.

कोणत्याही बैठकीत विषय मांडण्याची शैली, योग्य शब्दांची निवड आणि प्रभावी संवाद यामुळे संतोष कुलकर्णी हे उत्कृष्ट वक्ते म्हणूनही ओळखले जातात. कठीण विषयही सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रदीर्घ अनुभव आणि सोलापूर जिल्हा परिषदेत केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांची एमएसआरडीसीच्या मुंबई विभागात अधीक्षक अभियंता म्हणून नियुक्ती केली आहे. राज्यातील सात कार्यकारी अभियंत्यांच्या पदोन्नतीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यांच्या पदोन्नतीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा करत त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

सोलापूर जिल्हा परिषदेत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, कर्मचाऱ्यांची मने जिंकणारे आणि विकासकामांना नवी दिशा देणारे संतोष कुलकर्णी आता मुंबईतील महत्त्वाच्या जबाबदारीतून राज्याच्या पायाभूत विकासाला नवे बळ देणार असल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!