दिनांक २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अपरिहार्य कारणास्तव स्थगित
प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा सनियंत्रक कादर शेख यांचे अधिकृत निर्देश आणि आवाहन
दिनांक २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अपरिहार्य कारणास्तव स्थगित
प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा सनियंत्रक कादर शेख यांचे अधिकृत निर्देश आणि आवाहन
सोलापूर : दिनांक २७ जून २०२६: संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ ऐनवेळी पुढे ढकलण्यात (स्थगित) आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा TET जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.या अत्यंत संवेदनशील प्रकरणावर प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा सहनियंत्रक कादर शेख यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि परीक्षार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्देश व जाहीर आवाहन जारी केले आहे.
१. सर्व केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख आणि परीक्षा पर्यवेक्षक यांच्यासाठी कडक निर्देश:
परीक्षा प्रक्रिया तात्काळ थांबवा: जिल्ह्यातील ज्या-ज्या केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते, त्या सर्व केंद्रांवरील परीक्षेची तयारी तात्काळ थांबवण्यात यावी.
केंद्रांवर सूचना फलक लावा: परीक्षा स्थगित झाल्यामुळे दूरवरून येणाऱ्या परीक्षार्थींची गैरसोय होऊ शकते. यासाठी सर्व केंद्रप्रमुखांनी उद्या (२८ जून) सकाळीच आपल्या परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ‘परीक्षा स्थगिती’बाबतचे अधिकृत फलक किंवा सूचनापत्रक ठळकपणे लावावे.
गोपनीय साहित्याची सुरक्षा: परीक्षा संदर्भातील सर्व साहित्य, प्रश्नपत्रिका किंवा गोपनीय दस्तऐवज सुरक्षित ठेवण्याची योग्य ती खबरदारी केंद्रप्रमुखांनी स्वतः घ्यावी.
२. सर्व परीक्षार्थी बंधू-भगिनींना आवाहन:
परीक्षा रद्द झालेली नसून केवळ पुढे ढकलण्यात आली आहे, याची नोंद घेऊन अभ्यास सुरू ठेवावा.
अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही अनधिकृत माध्यमांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या आणि अफवांना बळी पडू नका.
परीक्षेच्या पुढील सुधारित तारखा आणि सर्व अधिकृत माहिती केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mscepune.in) प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांनी नियमितपणे या संकेतस्थळाला भेट द्यावी.





