क्राईम

पॉक्सो तक्रारीचा सूड; जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून सहा जणांची निर्घृण हत्या

जामिनावर बाहेर येताच रक्तरंजित थैमान; एका रात्रीत सहा जणांची हत्या

पॉक्सो तक्रारीचा सूड; जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून सहा जणांची निर्घृण हत्या

हैदराबाद : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील शाबाद परिसरात एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. पॉक्सो (POCSO) प्रकरणात जामिनावर सुटलेल्या ३५ वर्षीय आरोपीने सूडाच्या भावनेतून अल्पवयीन पीडित मुलगी, तिची आई आणि आजी यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या घरी जाऊन पत्नी आणि दोन लहान मुलांचाही खून करत एकाच रात्रीत सहा जणांचे जीव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार नावाच्या आरोपीविरोधात मे महिन्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.

शुक्रवारी रात्री आरोपी थेट पीडित मुलीच्या घरी पोहोचला. घराचा दरवाजा उघडताच त्याने मुलीच्या आईवर चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली. त्यानंतर घरातील ६० वर्षीय आजीलाही निर्दयपणे ठार केले.

यावरही न थांबता आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कारमधून गावाजवळील तलाव परिसरात नेले. तेथे चाकूने वार करून तिची हत्या केली आणि मृतदेह तलावाच्या काठावर फेकून दिला.

यानंतर आरोपी स्वतःच्या घरी परतला. तेथे झोपलेल्या आपल्या ३१ वर्षीय पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. त्यानंतर अवघ्या चार वर्षांच्या आणि १८ महिन्यांच्या दोन निष्पाप मुलांनाही त्याने जीवे मारले.

सहा जणांची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत.

या घटनेनंतर पॉक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जामीन देताना अधिक कठोर निकष असावेत का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!